पुणे : सध्या पुणे शहरात दररोज सरासरी सहा ते सात दुचाकी तसेच एक ते दोन मोटारी चोरीला जात आहेत. वाहनांच्या चोरीची आता लोकांना इतकी सवय झाली आहे की, पोलीसही त्याच्याकडे आता रुटीन म्हणून बघत आहेत. त्यामुळेच की काय म्हणून चोरांनी चक्क पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटबाहेर उभी केलेली वाहतूक पोलिसाची मोटारसायकल चोरुन नेण्यापर्यंत हिंमत वाढली आहे़.
पुणे पोलीस आयुक्तालयात कामाला असलेल्या वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्याची आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्रासमोर लावलेली मोटारसायकल चोरीला गेली आहे़. विशेष म्हणजे संपूर्ण शहरात व्यापारी, गणेश मंडळांना सीसीटीव्ही लावण्याबाबत पोलीस आग्रह करीत असताना आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारात सीसीटीव्ही नसल्याचे वास्तव समोर आले आहे़. याप्रकरणी समीर चव्हाण (रा़ गोखलेनगर पोलीस वसाहत) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. चव्हाण हे वाहतूक शाखेत कार्यरत आहेत़. घटनेच्या दिवशी त्यांची रात्रपाळी होती़. त्यामुळे त्यांनी रात्री ९ वाजता पुणे आयुक्तालयाच्या गेट नंबर ३ बाहेर आपली मोटारसायकल पार्क केली़. सकाळी ड्युटी संपल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर त्यांची मोटारसायकल चोरीला गेली होती़. दोन दिवस त्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने बंडगार्डन पोलिसांकडे त्यांनी फिर्याद दिली आहे़.
शहरात वाहनचोरीच्या घटना सर्रास होत असतात़. काही वेळासाठी पार्क केलेल्या मोटारीच्या काचा फोडून आतील ऐवज चोरीला जात असतो तर अनेकदा काही मिनिटात दुचाकी लांबविल्या जातात़. पण चोरांनी पोलीस आयुक्तालयासमोरुन मोटारसायकल चोरुन नेल्याची ही बहुदा पहिलीच घटना आहे़.