मंगळवारी भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी८ फुटी शेतकरी पुतळा तयार केला होता. टिळक चौकात हा पुतळा आणण्यात आला.
तेव्हा पोलीस अधिकार्यांनी झडप घालून तो ताब्यात घेतला. त्यावर नितीन पवार यांनी पुतळा ठेवलेल्या पोलीस वाहनाकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे आले. पवार यांनी पोलीस वाहनासमोर बसकण मारली. पुतळा परत देण्याची मागणी केली. त्यांच्या जोडीला लोकायतचे प्रमुख नीरज जैन, शकुंतला भालेराव,ओंकार मोरे,श्रीकृषण कुलकर्णी,तुषार भोतमांगे,श्रीकांत ललिता यांनीही पोलिस वाहनसमोरचा रस्ता अडवला. मोर्चाच्या बंदोबस्ताला आलेल्या परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे व इतर वरिष्ठ अधिकारी तेथे आले. शेवटी पुतळा परत देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.
खरोखरीच संध्याकाळी उशिरा पोलिसांनी सभ्य माणसाने दिल्याप्रमाणे शब्द पाळला. शेतकरी पुतळा त्यांच्या वाहनाने कर्वे रोडवरील लोकायतच्या कार्यालयात पोहोच केला.
देशातल्या बळीराजाला अद्याप न्याय मिळाला नसला तरी त्याच्या पुतळ्याला तरी पुणे पोलिसांकडून न्याय मिळाला. यावर नितीन पवार म्हणाले “ पोलीस आणि आंदोलक यांच्यात अनेकदा विसंवाद निर्माण होतो. पोलीस दिलेला शब्द पाळत नाहीत असा अनुभव आंदोलक सांगत असतात. तर आंदोलक हे आततायी भूमिका घेतात असा आरोप पोलिस करत असतात. भारत बंदच्या आंदोलनात पुणे पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेऊन आणि दिलेला शब्द पाहून त्यांच्यावरील विश्वास हा वाढवला आहे. पुणे पोलीस अभिनंदनास पात्र आहेत. ”