नारायणगाव (पुणे) : शिकवणी वर्गावरून घरी पायी चालत जात असलेल्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य करणाऱ्या ओतूर (ता. जुन्नर) पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक नारायण भाऊसाहेब बर्डे याच्यावर विनयभंग आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून नारायणगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. नारायण भाऊसाहेब बर्डे (वय ३८ वर्षे), पोलिस अंमलदार (रा. आकाशगंगा कॉलनी, आळेफाटा, ता. जुन्नर) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीमधील नारायणगाव परिसरातील अल्पवयीन मुलगी निर्भया (काल्पनिक नाव) ही शिकवणी वर्गावरून पायी घरी चालत जात असताना आरोपी नारायण भाऊसाहेब बर्डे याने तिचा पाठलाग करून नारायणगाव हद्दीमधील कोल्हेमाळा-येडगाव रोडवर तिच्या घराजवळ १०० रुपये देतो. गाडीवर बस, असे म्हटले. तिने गाडीवर बसण्यास नकार दिला असता त्याने मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलगी घरी येऊन रडू लागल्याने तिच्या आजीने विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या पालकांनी सदर व्यक्तीचा शोध घेतला असता घटनास्थळ परिसरात आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पकडून नारायणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. बर्डे याने केलेल्या कृत्याचे सीसीटीव्हीचे फुटेज नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केले आहेत. पोलिस नाईक नारायण बर्डे हा ४ वर्षांपासून ओतूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे हे करीत आहेत.
दरम्यान, रक्षकच भक्षक झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिस नाईक बर्डे याने केलेला प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बर्डे यास पोलिस खात्यातून तत्काळ सेवामुक्त करावे; अन्यथा नारायणगावच्या महिला पोलिस ठाण्यावर मोर्चा काढतील, असा इशारा दिला आहे.