पुणे : पुणे पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत जुगार खेळताना चक्क ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सापडला असून, या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने जिल्हातील पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक विजय जाधव असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यासह अनेकांना पोलिसांनी पकडले आहे. तर क्लब चालक माजी नगरसेवक अविनाश जाधव यांच्यासह ४१ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ प्रवीण मुंडे व त्यांच्या पथकाने केली. मुंढवा परिसरात कपिल मॅट्रिक्स इमारतीमध्ये असणाऱ्या ३ आणि ४ मजल्यावर मध्यरात्री धाड टाकण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी रंगेहात पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह ४१ जणांना ताब्यात घेतले. तर त्या ठिकाणावरून ७ लाखाची रोकड, ४ चारचाकी आणि दुचाकी, टीव्ही असा जवळपास १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगवकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे आणि त्यांच्या पथकाने केली.
अधिक कठोर कारवाई करणार. जुगार तसेच या संबंधीत घटनेच्या शहर पोलिसांच्या अहवालाची वाट पाहत आहोत. त्यानंतर कठोर कारवाई करू. - सुवेझ हक, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण