पुणे : चेन्नईहून राजकोटला जाणार्या कंटेनरला सोडण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. त्या सहायक पोलीस निरीक्षकाने पैसेही स्वीकारले. त्याचवेळी त्याला संशय आला. तेव्हा तो पैसे तसेच टाकून आपली कार बेदकारपणे चालवत पळून गेला. पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर हा थरार घडला.सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित रामचंद्र अधटराव (महामार्ग सुरक्षा पथक, वडगाव) असे या पोलीस अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदार हे बालरोड लाइन्स यांचे हायड्रॉलिक/एक्सएल गाडीवर चालक असून ते गाडीतून पवनचक्कीचे नेसल घेऊन चेन्नईहून राजकोटला जात होते. तक्रारदार व त्यांचे सहकारी अशा २ गाड्या सत्यजित अधटराव याने पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्यावर अडवल्या. ही दोन्ही वाहने लॉकडाऊन उठल्यानंतर (३मे) सोडली जातील, असे कंटेनर चालकाला त्याने सांगितले. गाड्या सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे १० हजार रुपये असे २० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. चालकांनी लाचलुचपत प्रतिबंधिक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर तडजोडीअंती त्याने १५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले.त्यानुसार पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक सुनिल बिले, काँस्टेबल दीपक टिळेकर, अंकुश माने, चंद्रकांत कदम यांनी उर्से टोलनाक्यावर रात्री सव्वा नऊ वाजता सापळा रचला. तक्रारदार याच्याकडून सत्यजित अधटराव याने १५ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर त्याला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम टेबलवर फेकून दिली व आपल्या कारमध्ये बसून वेगाने तो पुण्याकडे पळून गेला. पोलिसांनी वडगाव पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.
कंटेनर सोडण्यासाठी १५ हजारांची मागणी; संशय येताच पैसे टाकून पळाला पोलीस अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 11:22 AM