पोलीस शिपाई विजयकुमार सुभाष पाटणे असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. पाटणे हे कोथरूड पोलीस ठाण्यात नेमणुकीला होते. त्यांची नेमणूक १० मे रोजी मास्क कारवाईसाठी करण्यात आली होती. त्याचे सहकारी पोलीस शिपाई श्रवण शेवाळे यांची देखील नेमणूक मास्क कारवाईसाठी करण्यात आली होती. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते पौड फाटा येथे काम करत असताना विजयकुमार हे त्यांचे कर्तव्य सोडून पौड फाटा येथे गेले. या वेळी श्रवण यांना फोन आल्याने ते फोनवर बोलत काही अंतर पायी गेले. त्या वेळी दुचाकीवर पाठीमागून विजयकुमार गेले आणि तू मला धक्का का दिला, असे म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मारहाण केली. डोक्यात आणि छातीवर बुक्क्यांचा मारा केला. भर रस्त्यावर हा प्रकार घडला. श्रवण यांचे सहकारी रमेश चौधरी यांनी हा प्रकार पाहून विजयकुमार यांना आवरण्याचा प्रयत्न केला. त्यात चौधरी यांच्या हाताच्या करंगळीला मार लागला. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले. चौकशीत श्रवण यांनी काहीही एक न बोलता त्यांना मारहाण झाल्याचे समोर आले. विजयकुमार पाटणे यांनी काहीही कारण नसताना आपल्याला नेमून दिलेले कर्तव्य सोडून केवळ वैरभावनेने पौड फाटा नाकाबंदी पाइंटला जाऊन सर्व लोकांसमोर सहकाऱ्याला मारहाण करून पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन केल्याबद्दल विजयकुमार पाटणे यांना निलंबित करण्यात आले आहे.
भर रस्त्यात सहकाऱ्याला मारहाण करणारा पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:09 AM