पुणे : पोलीस उपायुक्तांनी जिल्हा सरकारी वकिलांना पोहोचवण्यासाठी दिलेल्या प्रस्तावात परस्पर खाडाखोड करुन कालावधीत बदल करणाऱ्या पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस नाईक स्वप्नील बारटक्के असे त्यांचे नाव आहे. स्वप्नील बारटक्के यांची उत्तमनगर पोलीस ठाण्यात नेमूणक करुन त्यांना परिमंडळ ३ च्या कार्यालयात प्रतिनियुक्ती नेमण्यात आले होते.
कोथरुड येथील एका गुन्ह्यात प्रस्तावित कार्यवाहीबाबत अभिप्राय मिळविण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी केला होता. तो शिवाजीनगर येथील जिल्हा सरकारी वकिलांकडे देण्यासाठी १ सप्टेंबर रोजी बारटक्के यांच्याकडे दिला होता. त्यांनी या प्रस्तावात पोलीस उपायुक्त यांची पूर्व परवानगी न घेता परस्पर स्वहस्ताक्षरात त्यांच्या प्रस्तावात नमूद केलेल्या दिवसाच्या कालावधीच्या जागी १ खोडून ७ अशी खाडाखोड करुन कालावधी बदल केलेला अहवाल जिल्हा सरकारी कार्यालयात दाखल करुन कर्तव्यात गंभीर कसुरी केली. हा प्रकार समजताच पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी स्वप्नील बारटक्के याला निलंबित केले आहे.