लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: अनेक पोलीस परराज्यात जाऊन जीव धोक्यात घालून आरोपींना पकडतात. तडीपार असलेले गुन्हेगार शहरात येऊन गुन्हे करत असेल. शस्त्रे बाळगून असलेला गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तो गोळीबार करु शकतो, प्रसंगी पोलिसांच्या जीवावरही बेतू शकतो,अशा गुन्हेगारांना पोलीस अधिकारी, कर्मचारी जीवावर उदार होऊन पकडतात. या पोलिसांच्या कामगिरीपेक्षा पोलीस अधिकाऱ्यांना त्यांना मिटिंगला वेळवर पोहचविणारे चालक, ऑपरेटर अधिक महत्वाचे वाटू लागले आहेत. त्यामुळे तपास करणार्या पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा वाहनचालक व ऑपरेटरवर बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे.
पुणे शहर पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांनी या वर्षभरात विशेष कामगिरी केलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना बक्षीसे मंजुर केली आहेत. त्यातील वेगवेगळ्या पोलीस उपायुक्तांनी बक्षिसे देताना वेगवेगळा निकष लावल्याने पोलीस दलात असंतोष निर्माण झाला आहे.
परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी बक्षिसे मंजूर करताना सर्वाधिक बक्षिसे ही त्यांना दर आठवड्याला पोलीस आयुक्तालयात होणार्या गुन्हे मिटिंगसाठी वेळेवर पोहचविल्याबद्दल चार पोलीस कर्मचार्यांवर खैरात केली आहे. इतकेच नाही तर प्रत्येक मिटिंगला वेळेवर पोहचविल्याबद्दल प्रत्येक वेळी प्रत्येकी १ हजार रुपये चौघांना बक्षिसे दिली आहेत. अशा प्रकारे २० मिटिंगला वेळेवर पोहचविल्याबद्दल प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे जवळपास ८० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली आहेत. इतकेच नाही तर वेगवेगळ्या वेळी त्याच कर्मचार्यांनी उत्तम बंदोबस्त ठेवल्याबद्दल त्यांच्यावरच बक्षिसांची मेहरनजर करण्यात आली आहे. याच कर्मचार्यांवर एक लाखांवर बक्षिसांची खैरात केली आहे.विशेष म्हणजे याव्यतिरिक्त परिमंडळातील अन्य कोणालाही बक्षिसे मंजूर केली गेलेली नाही.
सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी चालक व ऑपरेटर यांना अनेक वेळा १ हजार रुपयांची बक्षिसे मंजूर केली.त्याच वेळी वेगवेगळ्या बंदोबस्तात चांगली कामगिरी केलेल्या काही कर्मचार्यांना केवळ जीएसटी मंजूर केली आहे. दुसरीकडे सायबर गुन्ह्यामध्ये तातडीने कारवाई करुन गुन्ह्यात लांबविलेली १०० टक्के रक्कम परत मिळवून दिलेल्या पोलीस कर्मचार्यांना केवळ २५० रुपये बक्षिसे मंजूर करुन त्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे दिसून येत आहे. लाखांहून अधिक रक्कमेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात केवळ १०० रुपये ते ३०० रुपयांची बक्षिसे मंजूर केली गेली आहेत.
चालक, ऑपरेटरांवर बक्षिसांची अशी खैरात केली जात असताना प्रत्यक्ष गुन्हेगारांना परराज्यात जाऊन पकडून आणणे, खूनाचा प्रयत्न, चोरीसह अनेक किचकट गुन्ह्यांचा यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस अधिकारी,कर्मचार्यांना अगदी ५० रुपयेपासून ५०० रुपयांपर्यंत बक्षिसे मंजूर केली आहेत. यातील तपासातील बक्षिसे देण्यावरुन पोलीस दलात चर्चेचा विषय झाला आहे.