पुणे : मोटारीला जॅमर लावल्यानंतर वाहतूक पोलिसांसोबत उफाळलेल्या वादामधून भाजपा नगरसेवक अमोल बालवडकर यांना अटक झाली. या वादाला आता नवे वळण लागले असून, शिवाजीनगर वाहतूक विभागाचे निरीक्षक शंकर डामसे यांनी वाहतूक शाखेच्या वारजे विभागाचे निरीक्षक सुनील पाटील यांच्याविरुद्ध हस्तक्षेपाची लेखी तक्रार वाहतूक उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे केली आहे. पाटील यांनी बालवडकरांच्या बाजूने फोन करून कारवाईत हस्तक्षेप केल्याचे; तसेच डामसे यांनी मद्य प्राशन केल्याची खोटी तक्रार द्यायला लावून त्यासाठीची चाचणी घेऊन अपमानित केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक शंकर डामसे हे शिवाजीनगर वाहतूक शाखेचे प्रमुख आहेत. १० एप्रिल रोजी जंगलीमहाराज रस्त्यावर वाहतूक नियमन करीत असताना, ‘नो- पार्किंग’मध्ये उभ्या असलेल्या मोटारीवर वाहतूक पोलिसांनी जॅमर लावून कारवाई केली होती. ही मोटार नगरसेवक बालवडकर यांची होती. त्या वेळी त्यांच्या चालकाने पोलिसांंना ड्रायव्हिंग लायसेन्स देण्यास नकार देऊन पावती करणार नाही, काय करायचे ते करा, असे सुनावले. जॅमर कारवाई करून पुढे निघून गेल्यानंतर दहा मिनिटांनी निरीक्षक सुनिल पाटील यांनी फोन करुन डामसे यांना माझ्या मित्राची गाडी असून ती सोडून द्या असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने बालवडकर यांनी फोन करुन डामसे यांना मी नगरसेवक असून कोणाच्या गाडीला जॅमरलावायचा हे कळत नाही का, तुम्हाला बघून घेतो असे म्हणत पोलीस कर्मचा-यांना तुमचा साहेब किती दारु प्यायलेला आहे, त्याला बोलावून घ्या असे शब्द वापरल्याचे डामसे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. सहायक आयुक्त प्रीती टिपरे यांनी बालवडकर समक्ष ब्रेथ अनालायझरद्वारे डामसे यांची मद्य चाचणी घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यासंंपुर्ण प्रकरणानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन बालवडकरांना अटक केली होती. एकूणच डामसे यांनी घडलेला प्रकार व पाटील यांच्याकडून कारवाईत होणारा हस्तक्षेप यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.पोलीस निरीक्षक शंकर डामसे यांनी केलेला बाराशे शद्बांचा अर्ज सोशल मिडीयासह व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. त्यामुळे पोलीस प्रशासनाला गंभीर दखल घ्यावी लागली आहे. बालवडकर यांनी डामसे दारू प्यायलेले असल्याची तक्रार केल्यावर सहायक आयुक्त प्रीती टिपरे यांनी डामसे यांना वाहतूक कार्यालयात बोलावून घेतले. बालवडकरांसमोरच त्यांची ब्रेथ अनालायझरने तपासणी करण्यात आली. या प्रकारामुळे पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, असा प्रकार घडायला नको होता अशा प्रतिक्रियाही दिल्या.घडल्याप्रकारामुळे माझी मन:स्थिती ठीक नाही. मात्र, जे काही घडले ते चुकीचे होते. त्याबद्दल मी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबतचा तपास करुन ते योग्य तो निर्णय घेतील. - शंकर डामसे, पोलीस निरीक्षकसूडबुद्धीने कारवाई : अमोल बालवडकरशिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी आपल्यावर केलेली कारवाई आकसापोटी आणि सूडबुद्धीने केली असून, वाहतूक शाखेच्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण एकही शब्द चुकीचा बोलल्याचे सिद्ध झाल्यास आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ, असे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.वाहतूक पोलीस निरीक्षक शंकर डामसे यांना दमदाटी करून, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बालवडकर यांना गेल्या मंगळवारी अटक झाली होती. ते व त्यांचा वाहनचालक गणेश चौधरी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या पत्नीच्या नावे असलेले हिंजवडीतील यश वाइन्स हे अनधिकृत दुकान मी बंद पाडल्याने माझ्यावर आकसाने कारवाई करण्यात आली, असा आरोप करून बालवडकर म्हणाले की, नियम मोडल्याबद्दल दंडाची पावती करा, असे सांगूनही मोटारीला जॅमर लावण्यात आला. नंतर दंडाची पावती न करताच जॅमर काढण्यात आल्याने अधिकाऱ्यांची नियमांबद्दलची मानसिकता दिसते. बालवडकर म्हणाले, गुन्हा नोंदविल्याचे मला दुसऱ्या दिवशी समजले. घटनास्थळी हजर नसताना माझ्यावर गुन्हा नोंदविला गेला. अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यता असताना मी हजर झालो. या प्रकरणी पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे.डामसे यांना फोन केल्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दोन तास होऊनही ते घटनास्थळी आले नाहीत. त्यांचे आणि माझे दहा सेकंदही बोलणे झालेले नाही. त्यांच्याकडे माझ्या आवाजाचे रेकॉर्डींग असल्यास, त्यात मी त्यांना एक शब्द जरी चुकीचा बोलल्याचे दिसल्यास मी पदाचा राजीनामा देईन.
पोलीस अधिकाऱ्यांतच जुंपली
By admin | Published: April 16, 2017 4:18 AM