लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पती काम करीत असलेल्या मुंबईत तेही मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीच्या प्रलोभनाने एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला सायबर चोरट्यांनी तब्बल सव्वा नऊ लाख रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी धानोरी येथील ३७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच मोबाइलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ ते ९ मार्च २०२१ दरम्यान घडली.
फिर्यादी या उच्चशिक्षित असून त्यांचे पती मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. फिर्यादी यांना मुंबई येथील कंपनीत नोकरी हवी होती. त्यासाठी त्यांनी आपला बायोडाटा नोकरी विषयक संकेतस्थळावर अपलोड केला होता. त्या माहितीच्या आधारे सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. करिअर जॅाब्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळवून देण्यासाठी कन्स्लटन्सी म्हणून काम करत असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांना वेगवेगळी कारणे सांगून तब्बल ११ लाख ६५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
दरम्यान, नोकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने त्यांच्याकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. तेव्हा त्यातील २ लाख ४० हजार रुपये त्यांनी परत केले. परंतु, अनेकदा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी ९ लाख २५ हजार रुपये परत न केल्याने शेवटी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
---
जॉब फ्रॉडमध्ये मोठी वाढ
नोकरीच्या आमिषाने फसवणूक करण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा मोठी वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागल्याने तसेच उत्पन्नात घट झाल्याने तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. त्याचा सायबर चोरटे गैरफायदा घेत असून त्यामुळे अशा संकेतस्थळावरून आलेल्या अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना सावध राहण्याचा व त्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.