पुणे : ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात फरार ललित पाटील याला अटक केल्यावर पुणे पाेलिस ॲक्शन माेडवर आले आहेत. ललित पाटीलवर उपचार करणारे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्या पथकातील वरिष्ठ डाॅक्टर, लेक्चरर, एक्स-रे तंत्रज्ञ आदींची चाैकशी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ‘ससून’मध्ये माेठी कारवाई हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल असताना ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवणारा ललित पाटील हा पळून गेला आणि सर्व कारनामे एक एक करून पुढे येऊ लागले. हे प्रकरण राज्यभर गाजले. अखेर यंत्रणेलाही गंभीर दखल घ्यावी लागली. याबाबत ‘लाेकमत’ने केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला. विशेष म्हणजे, पाेलिसांनी दिवाळीच्या आधीपासूनच गुप्तपणे या सर्वांची चाैकशी सुरू केली आहे. ललितच्या चाैकशीमधून जे काही तपशील समाेर येतील, त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे, याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात येत आहे. ज्यांना चाैकशीसाठी बाेलावले जात आहे, त्यांच्याकडून लेखी जबाब लिहून घेतले जात आहेत.
चाैकशीसाठी तीन विभाग
- ललितवर उपचार सुरू असताना त्याच्यावर मेफेड्राॅनप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे अमली पदार्थविराेधी पथक चाैकशी करीत आहे. त्याअनुषंगाने ससून रुग्णालयातही चाैकशी केली जात आहे.
- ललित पळून गेल्याप्रकरणी गुन्हे शाखा तपास करीत आहे. तसेच, ललितवर माेक्का लागल्याने त्याचा तपास सहायक आयुक्त सुनील तांबे करीत आहेत.
- कारागृह प्रशासनाकडूनही ससून रुग्णालयामधील ललित पाटील प्रकरणाचे रेकाॅर्ड मागितले जात आहेत.
ससून आणि कारागृह प्रशासन आमने-सामने :
ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांनी ललित पाटील याला उपचारासाठी ससून रुग्णालयात ठेवा, असे पत्र दिल्याचे काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले हाेते, तर ललित पाटील याला उपचारांसाठी तुमच्याकडेच राहू द्या, असे पत्र कारागृह प्रशासनाने ‘ससून’ला दिले हाेते, असे पत्र आता व्हायरल झाले आहे. यावरून ससून रुग्णालय आणि येरवडा कारागृह प्रशासनात शीतयुद्ध सुरू झाले असून, ते आता चव्हाट्यावर आले आहे.
आमच्याकडे केवळ ड्रग्ज प्रकरणात तपास सुरू आहे. यात डाॅक्टर आणि कर्मचारी यांचा सहभाग नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, ललित पळून गेल्याप्रकरणी दुसरे पाेलिस निरीक्षक सखाेल चाैकशी करीत आहेत.
- सुनील तांबे, सहायक पाेलिस आयुक्त, पुणे शहर