तन्मय ठोंबरे
पुणे : बाणेर येथील स्वर्णव चव्हाण या चार वर्षाच्या बालकाचे अपहरण झाल्याची घटना ताजी आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणी पोलीस चौकी होती; परंतु तेथे पोलीस नसल्यामुळे या घटनेबाबत काहीच करता आले नाही. शहरातील इतर पोलीस चौक्यांबाबत ‘लोकमत’ने पाहणी केली असता अनेक ठिकाणी चौकी आहे, मात्र पोलीस गैरहजर असल्याचे दिसून आले. काही चौक्या तर चक्क बंद होत्या.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा वावर महत्त्वाचा आहे. त्यामुळेच पोलीस ठाण्यांची हद्द मोठी असल्याने स्थानिक पातळीवर लोकांना तक्रारी मांडता याव्यात, गुन्हेगारांवर धाक रहावा यासाठी पोलीस चौक्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौक्या तयार केल्या. शहरात ‘लोकमत’ने पाहणी करून अनेक पोलीस चौक्यांना भेटी दिल्या. तेव्हा ही बाब समेार आली. बऱ्याच पोलीस चौक्यांना कुलूपच लावलेले दिसले. चौकीवर अनेकदा पोलीस कर्मचारी गैरहजरच असतात. पोलीस चौकीच्या आजूबाजूच्या लोकांना या चौकीबाबत विचारणा केली असता, त्यांनी पोलीस कधीच दिसत नाहीत, असेच सांगितले.
कोरोनाची लागण झाल्याने पोलिसांची संख्या कमी
पुणे पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालाय आहे. त्यामुळे पोलिसांचे बळ कमी झाले आहे. म्हणून पोलीस चौकीत पोलीस नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी चौकीत पोलीस असणे गरजेचे आहे. अशी नागरिकांची मागणी आहे.
''या पोलीस चौकीमध्ये सकाळीच कर्मचारी दिसतात; पण काही वेळाने ते गायब झालेले असतात. चौकी बंद करून ते कुठे जातात माहिती नाही असे सोलापूर बाजार पोलीस चौकीजवळील एका नागरिकाने सांगितले आहे.''
''पोलीस चौकीत कर्मचारी नाहीत. ते बंद करून बाहेर गेले आहेत. चौकीसमेार मोबाइल नंबर लिहिलेला आहे. त्यावर फोन केला की ते येतात; परंतु नेहमी चौकीला कुलूपच असते असे चारबावडी पोलीस चौकीजवळील नागरिकाने सांगितले आहे.''
''सकाळी पोलीस असतात; पण दुपारी नसतात. कदाचित जेवायला बाहेर जात असतील. संध्याकाळी परत येतील; पण नेहमी चौकी सुरू असलेली दिसत नाही असे फडगेट पोलीस चौकीजवळील नागरिकने सांगितले आहे.''