लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराचा वाढता विस्तार, उपनगरातील वाढत असलेली गुन्हेगारी, त्यामुळे शहरात होणाऱ्या घटनांची माहिती मिळताच त्यासाठी पोहोचण्यासाठी शहरात तब्बल ७५१ वाहनांद्वारे गस्त घातली जात आहे. शहराच्या कोणत्याही भागात एखादी घटना घडली, तर त्या ठिकाणी पुणे पोलीस सरासरी ७ मिनिटांच्या आत पोहोचत असल्याचे दिसून आले आहे. त्यात ४३३ दुचाकी वाहने आणि ३१८ चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
पुणे पोलिसांनी शहरात कोणत्या वेळी, कोठे, काय घटना घडल्या होत्या, याचा अभ्यास करून ज्या ठिकाणी सर्वाधिक घटना घडल्या ती ठिकाणे निवडली. या ठिकाणी कधी कोणत्या वेळी काय घटना घडल्याचा चार्ट तयार केला. त्यात कोणता महिना, दिवस, सण, उत्सव यामध्ये या घटना घडल्या होत्या. याचा अभ्यास करून त्याची सर्व माहिती एकत्रित केली. त्यानुसार शहरात ३० मोबाईल व्हॅनमार्फत संभाव्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला.
शहरात झोननुसार गस्त घालणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवले जाते. पोलीस ठाण्यातून गस्तीसाठी बाहेर पडताना त्या वाहनांची नोंद नियंत्रण
कक्षात केली जाते. काही जुनी वाहने सोडली तर सर्व गस्तीच्या वाहनांवर तसेच बीट मार्शल यांच्या दुचाकीला जीपीएस प्रणाली जोडण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही वाहन घटना घडली, त्यावेळी कोठे होते, घटनेपासून कोण जवळ आहे, याची माहिती तातडीने मिळत असल्याने त्यांना नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात येते. प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय एक बीट मार्शलची जोडी २४ तासात कार्यरत असते. याशिवाय दामिनी पथकाची गस्त असते.
..........
शहरात ३४० घरफोड्या, अन् ९६७ चोऱ्या
पुणे शहरातील ३० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या वर्षभरात ३४० घरफोड्या झाल्या होत्या. तर २०१९ मध्ये ४६० घरफोड्या झाल्या होत्या. गेल्या वर्षी ५९० चोरीच्या घटना दाखल करण्यात आल्या होत्या. २०१९ मध्ये १३६७ चोऱ्या झाल्या होत्या.
........
गस्तीवरील वाहने
दुचाकी ४३३
चारचाकी ७५१
.........
पोलीस ठाणे, झोन निहाय गस्तीवरील वाहनांवर नियंत्रण ठेवले जाते. जीपीएस प्रणाली वाहनांवर बसविली असल्याने घटनास्थळी पोलीस कधी पोहचले, याची दररोज माहिती घेतली जाते. एखाद्या ठिकाणी पोलीस उशिरा पोहोचले तर त्यामागील कारणाचा शोध घेतला जातो.
स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, प्रशासन