पुणे : एल्गार परिषदेच्या आयोजनाला पुणे पोलिसांनी परवागनी दिली आहे. त्यानुसार येत्या 30 जानेवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे ही परिषद होणार आहे.
यापूर्वी निवृत्त न्यायाधिश बी. जी. कोळसे पाटील यांनी 31 डिसेंबर 2020 रोजी एल्गार परिषद आयोजित करण्याची घोषणा केली होती. परिषदेला परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतर एल्गार परिषदेला परवानगी नाकारल्यास परिषद रस्त्यावर घेऊ, अन्यथा जेलबंद आंदोलनाचा इशारा बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता.
दरम्यान, साधारण तीन वर्षापूर्वी डिसेंबर 2017 मध्ये शनिवारवाड्यावर एल्गार परिषद घेण्यात आली होती. ती पुढे वादग्रस्त ठरली. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. या परिषदेचा संबंध पोलिसांनी कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराशी जोडला होता.
आता एल्गार परिषदेला परवानगी देण्यात आली असून, 30 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे ही परिषद होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियमावली ठरवून दिली आहे. त्यानुसार 200 जणांना कार्यक्रमात सहभागी होता येईल, असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सांगितले.
.....