पुणे : पोलीस क्रीडा निधीची रक्कम एक कोटी रुपयांवरुन तीन कोटी रुपये करण्यात येणार असून, सिंथेटीक ट्रॅकसाठीदेखील निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली.एसआरपीएफ गट दोनच्या संकुलात ६६ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशीप स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, गृह सचिव सुदीप श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेशकुमार मेटला, आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि नेमबाज अंजली भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलीस महासंचालक माथूर यांनी पोलीस दलातील खेळाडूंचा स्तर उंचावण्यासाठी दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि सिंथेटीक ट्रॅकसाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती. सिंथेटीक ट्रॅकमुळे अॅथलिटना चांगला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात निधी वाढवून देण्याचे आश्वासन दिले. क्रीडा निधी मिळाल्याने खेळाचा दर्जा उंचावेल, असे मत व्यक्त होत आहे़दोन हजारांवर खेळाडूंचा सहभागअखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशीप स्पर्धेत विविध राज्यांचे पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस दलातील दोन हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. त्यात अर्जुन पुरस्कार विजेते १५ खेळाडू देखील होते. यावेळी महाराष्ट्र पोलीस आणि प्रो-कबड्डी संघात प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. या सामन्यानंतर आसाम आणि नागालँडच्या कलाकरांनी पारंपारिक नृत्य सादर केले.
पोलीस क्रीडा निधी ३ कोटींपर्यंत वाढवणार, सिंथेटिक ट्रॅकसाठी निधी देणार - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 1:32 AM