पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस बाळासाहेब अटल यांच्या शीतपेयाच्या गोडावूनमधून १० लाख १११ रुपयांची रोकड लंपास करण्यार्या तिघा जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीचा प्लॅन राज्य गुन्हे अन्वेषण विभागामध्ये (सीआयडी) सध्या सहायक अधीक्षक असलेल्या महिला अधिकार्याच्या मुलाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कौस्तुभ नरेंद्र कुर्लेकर (वय २८, रा. तुळशीनगर, बिबवेवाडी), शुभम विजय हुले (वय १९, रा. तुळशीनगर, बिबवेवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबत १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी ब्रिजमोहन ऊर्फ बाळासाहेब अटल (वय ४९, रा. महर्षीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ९ मे रोजी मध्यरात्री या आरोपींनी मार्केट यार्ड येथील त्यांचे गोडावून फोडून १० लाख १११ रुपये लंपास केले होते. सराईत घरफोड्यांप्रमाणे त्यांंनी कपाट कापून रोकड लंपास केली होती. पोलीस कर्मचारी योगेश जगताप यांना खबर्यामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांच्या कानावर घातली. त्यानुसार उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त जयवंत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट एसटी स्थानकामध्ये तपास पथकाचे सहायक निरीक्षक संदेश केंजळे आणि सहकार्यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून ९ लाख ५० हजार रोख, मोबाईल, सोन्याची अंगठी असा ९,९०,३४९ रुपयांचा ऐवज हस्तगत केला.(प्रतिनिधी)
पोलीसपुत्राकडून चोरीचा प्लॅन
By admin | Published: May 16, 2014 4:37 AM