पुणे: आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून, यंदा वारीमध्ये भाविकांची व वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. यानिमित्ताने अवघे देहू भक्तीमय झाले असून, इंद्रायणी नदीकाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी वारीचा ३३९ वा पालखी सोहळा २८ जून ते १७ जुलै कालावधीत साजरा होत आहे. मुख्य मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी फुलांची सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याबरोबरच पोलीस बंदोबस्त, सिसिटीव्ही कॅमेरे आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala)
१. पालखी सोहळ्यासाठी ठिकठिकाणी प्रकाश व्यवस्थेसाठी उंच टॉवर उभारण्यात आले असून, पदपथ दिव्यांव्यतिरिक्त १०० प्रखर प्रकाशझोतांची व्यवस्था करण्यात आली आहे. तुरळक पाऊस सुरू असतानाही महावितरणचे कर्मचारी २४ तास काम करीत आहेत. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी ठिकठिकाणच्या झाडांच्या फांद्यांचा अडथळा दूर केला आहे.२. पाटबंधारे विभागाच्या वतीने इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. नदीच्या घाटावर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफची तुकडी २४ तास लक्ष ठेवून आहे. नदीच्या तीरावर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.३. नगरपंचायतीने उघड्या गटारांची साफसफाई केली आहे. इंद्रायणी नदीच्या घाटाची स्वच्छता केली असून, पात्रातील जलपर्णी काढण्यात आली आहे. नदीघाटावर बायोकेमिकल पावडर टाकण्यात आली आहे.४. नदीजवळील नाल्याजवळ भाविकांसाठी तात्पुरत्या शौचालयांची उभारणी केली आहे. चौकाचौकात व जेथे दिंड्या उतरणार आहेत, तेथे आणि पालखी मार्गावर फिरती शौचालये ठेवण्यात आली आहेत. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पाण्याचे हौद ठेवण्यात आले आहेत. शौचालये स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. गावातील खुल्या गटारांचे खोलीकरण करण्यात आले आहे.५. रस्त्यांची साफसफाई करण्यात आली आहे. पावसाळा असल्याने खड्डे मात्र बुजविण्यात आलेले नाहीत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांचा कडेला लावण्यात आलेले होर्डिंग्ज, फलक काही अंशी काढण्यात आले आहेत.६. यात्रा काळात स्थानिक नागरिकांनी वाहने रस्त्यावर आणू नयेत अथवा उभी करू नयेत, शक्यतो दुचाकी वाहनांचा वापर करावा व स्वत:जवळ ओळखपत्र ठेवावे, असे अवाहन मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे व पोलिसांनी केले आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. २८ व २९ जून रोजी वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे.७. ठिकठिकाणी पाण्याचे टँकर ठेवण्यात आले आहेत. त्यावरील स्टिकर पाहूनच पाणी घ्यावे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. गावातील बहुतेक सर्वच रुग्णालयात काही बेड वारकऱ्यांसाठी तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या हेतूने राखीव ठेवले आहेत.८. गायरानात पीएमपीएमएल बसेस व एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. येथून भाविकांच्या सोयीसाठी आळंदी, पुणे स्टेशन, महापालिका भवन, निगडी, देहूरोड या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्था केली आहे.९. पालखीचे सेवेकरी देहूनगरीमध्ये येऊन दाखल झाले असून, त्यांनी आपापली कामे सुरू केली आहेत. दक्षिणेसाठी वापरले जाणारे तांब्याच्या कळशांना चकाकी दिली आहे. पालखीला कापड लावणे, गोंडे लावणे, इतर सजावट करणे ही कामे झाली आहेत.
साडेचारशेवर पोलिसांचा बंदोबस्त
देहूत ३ सहायक पोलिस आयुक्त, ६ पोलिस निरीक्षक, ३४ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ४०० पोलिस अंमलदार एवढा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रवेशद्वारत धातूशोधक यंत्र, सीसी कॅमेरे, दर्शनबारी, भाविकांना आत येण्याचा मार्ग व बाहेर जाण्याचा मार्ग, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची व्यवस्था, प्रदक्षिणा मार्ग, पालखीच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी बंदोबस्त आहे. अनगडशहा दर्ग्याजवळ प्रथमच लोखंडी अडथळे लावले आहेत. पालखीच्या पहिल्या विसावा स्थानावर सुरक्षिततेच्या कारणास्तव मोजक्याच लोकांना सोडण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यावर ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच
पालखी सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत पोलिसांची करडी नजर ठेवण्यात येत आहे. यामुळे चोरट्यांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. गर्दीवरही नजर ठेवण्यात येत आहे. मदतीसाठी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्यात आले असून, एकाच ठिकाणाहून सर्व भाविकांना व पोलिसांना सूचना दिल्या जात आहेत. चौदा टाळकरी कमान व देहू-आळंदी रस्त्यावरील देहूतील प्रवेशद्वार कमानीजवळ, अनगडशहावली बाबा दर्गा येथे ‘वॉच टॉवर’ उभारण्यात आले आहेत.
अन्नदानासाठी सज्जता
यात्रा काळात भाविकांसाठी गावातील अन्नदान मंडळे प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून महाअन्नदान करीत आहेत. आलेल्या प्रत्येक भाविकास येथील श्री शिवाजी महाराज चौकात श्री संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाच्या वतीने अन्नदान करण्यात येते. त्याची सुरुवात बुधवारपासूनच झाली असून, हे अन्नदान शनिवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रत्येक दिंडीला औषधोपचार किट
पहिल्या अभंग आरतीच्या अनगडशहावली बाबा दर्ग्याजवळ बॅरिकेट्स लावून मेघडंबरीजवळील परिसरात मर्यादित भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. नगरपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांच्या व दिंड्यांच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. येथे नगरपंचायतीच्या वतीने प्रत्येक दिंडीच्या विणेकऱ्याला दिंडीसाठी औषधोपचार किट भेट देण्यात येणार आहे.
बाह्यरुग्ण विभाग, रुग्णवाहिका
आरोग्य विभागाच्या वतीने गावातील विविध पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. मुख्य मंदिर, गाथा मंदिर, वैकुंठगमन मंदिर परिसरात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. यासाठी प्रतिनियुक्तीवर कर्मचारी येऊन दाखल झाले आहेत. यांच्या मदतीला १०८ टीमच्या २ रुग्णवाहिका, एक कार्डियाक रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.