राष्ट्रवादीच्या 'माहेर' घरी भाजप कार्यालयाला पोलिसांचे 'सुरक्षा कवच'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 04:54 PM2019-09-25T16:54:40+5:302019-09-25T16:55:44+5:30
शहरात काही दिवसांपूर्वीच पवारसाहेबांच्या आमराई येथील बंगल्याजवळ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
बारामती :राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामतीकर संतप्त झाले आहेत. बुधवारी(दि २५) सकाळी हजारो बारामतीकरांनी शहरात एकत्र येत त्यांच्या संतापाला वाट मोकळी केली.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या माहेर घर मानले जाणाऱ्या शहरात नुकत्याच सुरु झालेल्या भाजपच्या संपर्क कार्यालयाला सुरक्षेसाठी पोलीस आणि आरसीपी जवानांचा गराडा पडला आहे. बुधवारी सकाळपासुनच कार्यालयाला २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक,पाच पोलीस कर्मचारी,आरसीपी पथकाच्या १५ जवानांसह एकुण २० जणांचा कार्यालयाला बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी(दि २५) बारामतीकरांनी कडकडीत बंद पाळत शासनाचा निषेध केला.ज्येष्ठ नेते पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावरील कारवाई बारामतीकरांच्या जिव्हारी लागली आहे. कारवाईचे तीव्र पडसाद बारामतीमध्ये उमटल्यानंतर दक्षतेच्या पार्श्वभुमीवर भाजप कार्यालयाच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्यात आली आहे.
शहरात काही दिवसांपूर्वी पवारसाहेबांच्या आमराई येथील बंगल्याच्या जवळच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.बारामतीकरांच्या शासकीय कामातील अडचणी सोडविण्यासह येथील मतदारांशी संपर्क सातत्य वाढविण्यासाठी कार्यालय उघडण्यात आले आहे.
ईडी कारवाईनंतर काल रात्रीपासूनच शहरात तणावाचे वातावरणात आहे.
भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी जवळच असणाऱ्या भाजपच्या पक्ष कार्यालयाला कार्यकर्ते,नागरीक यांच्या संतापाची झळ बसु नये,याची पोलीस प्रशासनाने दक्षता घेतल्याचे पाहावयास मिळाले. बुधवारी शहरात दिवसभर राष्ट्रवादीच्या 'माहेर' घरी भाजप कार्यालयाला पोलिसांचा पडलेला गराडा चर्चेचा विषय ठरला. कोणतीही अघटित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय करण्याच्या हेतुने हा पोलीस बंदोबस्त लावला आहे. शहरात आज कडकडीत बंद पाळल्यानंतर भाजप कार्यालयात देखील आज शुकशुकाट पाहावयास मिळाला.
———————————