धनकवडी : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि परिसरात शांतता राखण्यासाठी पोलीस व नागरिकांमध्ये आवश्यक असलेला संवाद घडवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने आयोजित केलेल्या जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
जनहित फौंडेशन आणि सिद्धिविनायक ग्रुपने सावंत विहार परिसरातील सोसायटी समूहाची जनसंवाद अंतर्गत बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधला. यानिमित्ताने कोरोनाकाळात नागरिकांना सेवा देणारे आरोग्य निरीक्षक, महावितरणचे कर्मचारी, सुरक्षारक्षक, स्वच्छता दूत हे कोरोना योध्दे व्याख्याते संदीप चव्हाण, शिवभक्त अपूर्वा ठाकरे, आनंदा कांबळे, भगवान शिंदे व गिरीराज सावंत यांचा सत्कार केला.
सर्जेराव बाबर म्हणाले, पोलीस आणि नागरिकांत सतत संवाद होणे आवश्यक आहे. नागरिक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत राहिले तर समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.
जगन्नाथ कळसकर म्हणाले, सोसायट्यांनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे. खात्रीचे सुरक्षारक्षक नेमणे आणि सदैव सतर्क राहण्याचे आवाहन केले.
लोकसहभागातून कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि परिसरातील शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.
सोसायटी समुह, वसाहती, दाट लोकवस्ती परिसरात या उपक्रमात विभागवार बैठका घेण्यात येत आहेत.
सावंत विहार फेज तीन येथे ॲड. दिलिप जगताप यांनी जनसंवाद बैठकिचे संयोजन केले होते. यावेळी फेज एक, दोन व तीन, सिक्स सेंन्स, सनशाईन, अजिंक्य समृध्दी, शामाप्रसाद आदी सोसायट्यांचे
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी, महिला ज्येष्ठ नागरिक, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे शांतता समिती सदस्य आणि महिला दक्षता समितीच्या सदस्या उपस्थित होत्या.
फोटो ओळ : जनसंवाद अंतर्गत बैठकीमध्ये सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.