पुणे : ओबीसी आरक्षण बचावसाठी गुरुवारी सकाळी निघणारा मोर्चा पोलिसांनी नेत्यांनाच ताब्यात घेत दडपला. माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह कृती समितीच्या सर्व नेत्यांनाच पोलिसांनी शनिवारवाड्याजवळ ताब्यात घेतले व फरासखाना पोलिस ठाण्यावर नेले. मोर्चाला राजकीय स्वरूप आले, अशी टीका करत भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी प्रदेश अध्यक्षांनी मोर्चाकडे पाठ फिरवली.
शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यासाठी समीर भुजबळ यांच्यासह कार्यकर्ते शनिवारवाड्याजवळ जमले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, काँग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चवधरी व अन्य नेतेही यावेळी उपस्थित होते. दरम्यान फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी भुजबळ यांच्यासह सर्व नेत्यांना तिथेच ताब्यात घेतले व फरासखाना पोलिस ठाण्यात आणले.
उपस्थित पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाही, असे सांगत सर्वांना तिथून दूर केले. काही नेत्यांना पोलीस गाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयात नेले. त्याठिकाणी जिल्हाधिकारी प्रतिनिधीकडे निवेदन दिले. त्यात ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करू नये, ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाचे निवारण करावे अशा मागण्या नमूद केल्या आहेत.
दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनी या मोर्चाला राजकीय स्वरूप आले असल्याची टीका केली. तिथे शरद पवार व राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे फलक होते. त्यामुळेच आपण तिथे गेलो नाही. नियोजनाच्या बैठकीत तसे करायचे नाही असे ठरले होते, मात्र त्याचे पालन झाले नाही असे त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये रस्ता रोको
पुण्यात भुजबळ यांना अटक झाल्याने अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील पाथर्डी फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. सुमारे अर्धातास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.