पिंपरी : अवैधरित्या दारू विक्री आणि हुक्का पार्लर चालवल्या प्रकरणी हाॅटेलवर पोलिसांनी छापा टाकून दोन हजार ६१० रुपयांच्या विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या तसेच २३ हजार ४०० रुपयांचे हुक्का पिण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दोन मॅनेजर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बावधन येथे गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही कारवाई केली. प्रशांत प्रकाश बेलोसे (वय २७), स्वप्नील पांडुरंग मोहिते (वय ३०), अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही मॅनेजरची नावे आहेत. दोन्ही मॅनेजर सह श्रवण पुजारी (वय २६), यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी नितीन माणिकराव लोंढे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे हाॅटेल वाटर नाईन मल्टिकझाईन रेस्टाॅरन्ट अॅंड लाऊंज या हाॅटेलमध्ये अवैध दारूची विक्री तसेच हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हाॅटेलवर छापा टाकला. या कारवाईत आरोपींनी हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच दारू व हुक्का पित असल्याने मानवी सुरक्षा धोक्यात येईल. म्हणून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.