सांगवी : बारामती ताल्यक्यातील सांगवी येथे चार ठिकाणी अवैधरित्या सुरू असणाऱ्या दारूच्या अड्ड्यावर बारामती तालुका पोलीसांनी धाड टाकून चार जणांविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार सांगवी येथे चार ठिकाणी छापा मारून ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार ही कारवाई करण्यात आली. तर कारवाई दरम्यान देशी विदेशी दारुच्या बाटल्यांसह गावठी दारू असा एकूण ३१ हजार ७८५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पद्मिनी दत्तू सरवदे,गीता महादेव जगताप,शरीफ आदम शेख,शन्नौ निसार शेख अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. बारामती तालूक्यातील सांगवी येथील चांदणी चौक व मिलिंदनगर येथे अवैधपणे देशी -विदेशी दारू विक्री सुरू होती. याबाबत पोलिसांनी माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
पोलीस कारवाईचा होतो फक्त दिखावा.......
सध्या ग्रामीण पोलीस ठाण्यासह माळेगाव पोलीस दूरक्षेत्राच्या अधिपत्याखालील सांगवी, माळेगाव, खांडज, शिरवली, पाहुणेवाडी, नीरावागज, सह इतर गावांत अवैध धंदे चांगलेच फोफावलेले पाहायला मिळतात एकीकडे संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, मटक्यासह दारूच्या अड्ड्यावर दहा गावाचे लोक येऊन गर्दी करतात. यामुळे इथूनच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.मात्र, ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष घालत नसल्याचे चित्र आहे. पोलीस कारवाई नंतर देखील हे धंदे पुन्हा नव्या जोमाने सुरू होत असल्याचे पाहायला मिळते. पोलीस व अवैध धंदे वाल्यांचे लागेबांधे असल्यानेच कारवाईचा फक्त दिखावा होत असल्याची चर्चा ग्रामस्थांच्यात चांगलीच रंगते. यामुळे नुसत्या पोकळ कारवाया न करता या अवैध धंद्याला जरब बसणे गरजेचे आहे.