मावळ : नायगाव येथे मुंबई पुणे महामार्गावरील हाॅटेल शिवराजे याठिकाणी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारत 52 हजार 775 रुपयांचा बेकायदा दारुसाठा जप्त केला. अवैध व्यावसायकांवर धडक कारवाई करण्याचा इशारा दोन दिवसांपुर्वी काँवत यांनी दिला होता. त्यानुसार लोणावळा ते वडगाव दरम्यानच्या हाॅटेल व धाबे चालकांना हाॅटेल परिसरात बेकायदा व विना परवाना दारु विक्री करु नये अशा लेखी सुचना देऊन देखिल दारु विक्री सुरु असल्याची माहिती समजल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दोन दिवसांपुर्वी वडगाव हद्दीतील दोन हाॅटेलांवर अशीच कारवाई करत दारुसाठा जप्त करण्यात आला होता. नायगाव येथे शिवराजे हाॅटेलच्या मागील बाजुला असलेल्या घरात हा दारुसाठा ठेवण्यात आला होता. ग्राहकांच्या मागणीनुसार ती दारु पुरवली जात असे. लोणावळा उपविभाग सहाय्यक पोलीस अधिक्षक काँवत व पोलीस कर्मचारी व कामशेत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली. मागील दोन दिवसात झालेल्या कारवाया ह्या कामशेत व वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकार्यांना अवैध धंद्यांची खबर लागते मात्र त्या भागाचे इनचार्ज असलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याला आपल्या हद्दीत काही अवैध सुरु आहे याचा मागमूस नसणे ह्यामध्ये गौडबंगाल असल्याची शंका नागरिक उपस्थित करत आहेत. काँवत यांच्या धडक कारवाईची सर्वत्र चर्चा अाहे. तक्रारीची दखल घेतली जात असल्याने नागरिक देखिल थेट वरिष्ठांना अवैध धंद्याची खबर देत असल्याने पोलीस खात्यातील कलेक्टरांचे धाबे दणाणले आहेत.