राजेगाव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत खडकी येथील लॉजवर दौंड पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
सुकेशनी बाबाराव तोतडे (वय ३२, रा. कवडस, नागपूर), प्रकाश शंकरलाल चैरासिया (वय ३८, मध्य प्रदेश), सुनील व्यंकटराव जांभगे-पाटील (वय २५ मूळ रा. बसवकल्याण, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), संतोष जयाशिल शेट्टी (वय ३१ रा. हसूर) या चौघांना अटक करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील खडकी येथील सूर्या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कारवाईसाठी पथक तैनात केले. या पथकाने गुरुवारी (दि. १) सूर्या लॉजवर बोगस ग्राहक पाठवले असता या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून हा वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. पोलीस हवालदार एच. एस. होले यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी लॉजवर मिळालेल्या मुलीला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहे.