मार्गासनी - नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राजगडावर जाण्याच्या पर्यटकांची तपासणी करताना राजगडाच्या पायथ्याशी पाल खुर्द येथे वेल्हा पोलीसांनी गावठी कट्ट्यासह दोघे सराईत गुन्हेगार जेरबंद केले. त्यांच्याकडे ७ जिवंत काडतुसेही सापडली. या प्रकारामुळे राजगड वेल्ह्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. नीलेश शिवाजी गाडे (वय २४ ,रा. जनता वसाहत, पुणे) व युवराज भागुजी काळे (वय १८, रा. पर्वती, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.घातपाती कृत्य करण्याच्या हेतूने दोघे जण गावठी कट्टे ,काडतुसे घेऊन आले असावे, असा अंदाज वेल्हा पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.३१ डिसेंबरच्या निमित्ताने राजगडाच्या पाली दरवाजा येथे रविवार दुपारी साडेचारच्या सुमारास पोलीस हवालदार वळकुंदे, जी. बी. लडकत, साळुंखे, गुंडगे, दुर्ग मावळा संघटनेचे कार्यकर्ते असे पर्यटकांच्या वाहन, बॅग अशा सामानांची तपासणी करीत होते.नीलेश व युवराज यांच्या बॅगेमध्ये २ गावठी कट्टे व ७ जिवंत काडतुसे सापडली. वेल्हा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे म्हणाले.दोन्ही आरोपींवर आर्म अॅक्टप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. वेल्हा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे अधिक तपास करत आहेत.राजगडावर जाणा-या गुंजवणी व पाल खुर्द या दोन्ही मार्गावर वेल्हा पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.प्रथमच यंदा ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांची कसून तपासणी करण्यात आली.
गावठी कट्ट्यासह राजगडावर दोघे जेरबंद, तपासणी करताना पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:43 AM