पुणे - पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरतीसाठी पेपर सेटिंगचे काम सीसीटीव्हीच्या निगराणीत करण्यात आले होते. उत्तरपत्रिका तपासणीही काळजीपूर्वक करण्यात येत असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितले.नांदेड येथील गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर ही काळजी घेण्यात आली. पाषाण येथील पोलीस मुख्यालयात गुरुवारी लेखी परीक्षा झाली. पात्र ठरलेल्या ४ हजार ५५२ पैकी ४ हजार १४७ उमेदवार उपस्थित होते़ सुवेझ हक यांनी सांगितले की, परीक्षा संपल्यानंतर सायंकाळी उत्तर पत्रिकांचे स्कॅनिंग बंद खोली करण्यात आले़ तेथेही सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. संपूर्ण उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग झाल्यानंतरच त्या सर्व उत्तर पत्रिका सील करण्यात येणार आहे़ त्याची एक कॉपी आमच्याकडे राहणार आहे़ त्यानंतरही ज्यांना खूप गुण मिळाले असतील, अशांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जाणार असून सर्व उमेदवारांना किती गुण मिळाले, हे जाहीर करण्यात येणार आहे़ त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत.पेपर सेटिंगचे काम अधीक्षक व अपर अधीक्षक यांच्या देखरेखीखाली करण्यात आले़ पेपर सेटिंग केले. संबंधित सर्वांचे मोबाईल बाहेर ठेवण्यात आले होते़ संपूर्ण पेपर सेटिंग होऊन त्याच्या प्रिंट काढून त्या सकाळी उमेदवारांना वितरित करेपर्यंत संबंधितांना तेथेच थांबविण्यात आले होते़.- सुवेझ हक,पोलीस अधीक्षक
पोलीस भरतीचा पेपर सीसीटीव्ही निगराणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 3:45 AM