बारामती : कोरोनासह विविध कारणांमुळे २०१९ पासून लांबलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर मुहुर्त मिळाला आहे. राज्यात मेगा पोलीस भरती प्रक्रिया सुरू अखेर सुरु होणार आहे. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बहुप्रतिक्षीत पोलीस भरती प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. त्याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांनी प्रसिध्द केले आहे. त्यानुसार फक्त पोलीस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया १४९५६ जागांसाठी आहे. राज्य राखीव पोलीस दल व पोलीस वाहन चालक यांची या व्यतीरिक्त स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याच वेळी सुरू होणार आहे. त्यामुळे जागांमध्ये काही बदल होऊ शकतो. पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून ३० नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच साधरणत: २७ दिवस असणार आहे.
पोलीस शिपाई पदासांठी होणाऱ्या या भरतीप्रक्रियेमध्ये प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाच दिवसी आयोजित केली जाणार आहे. शारीरीक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार ११० प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेत सुध्दा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.
बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की, सन २०१९ पासून कोरोना महामारीमुळे व इतर कारणांनी पोलीस भरती प्रक्रिया लांबत गेली होती. उमेदवार खुप आशेने या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते. शासनाने सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरासह ग्रामीण भागातील तरुणांनी यासाठी मोठी तयारी केली आहे. यामध्ये मुली देखील मागे नाहीत. कोरोनानंतर सरकारी नोकरीचे महत्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या भरतीसाठी मोठी उत्सुकता असल्याचे रुपनवर म्हणाले.