शनिवारी सकाळी सातपासून पुणे शहर पोलीस दलाच्या भरतीला सुरुवात झाली. ही भरती प्रक्रिया चार दिवस चालणार आहे. सकाळी सातला हजेरी असल्यामुळे शहरातील शेकडो उमेदवार साडेसहाच्या ठोक्याला हजर होते. तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यांमधून आलेले तरुण आदल्या दिवशीच पुण्यामध्ये हजर झाले होते. परंतु, नेहमीच्या सवयीप्रमाणे पोलिसांच्या कामाला उशिराच सुरुवात झाल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. भरतीचा पहिलाच दिवस असल्यामुळे छाती आणि उंची मोजून झाल्यावर उमेदवारांना दोन ते तीन तास केवळ सूचना देण्याच्या नावाखाली थांबवून ठेवण्यात आले. दुपारी मुख्यालयातील झाडांखाली, फरशांवर आणि पायऱ्यांवर थकून झोपलेले उमेदवार दिसत होते. अनेकांनी दुपारचे जेवणही केलेले नव्हते. परगावाहून आलेल्यांच्या खिशामध्ये केवळ प्रवासापुरतेच पैसे असल्यामुळे त्यांनी वडापाव आणि चहावर समाधान मानलेले होते. पिण्याच्या पाण्यासाठी पोलिसांनी प्लॅस्टिकचे दोन पीप मैदानात ठेवलेले होते. पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकचेच ग्लास ठेवण्यात आलेले होते. प्रत्येक पिपावर एकच ग्लास असल्यामुळे पाणी पिण्यासाठीही रांग लावायची वेळ उमेदवारांना आली. यासोबतच अनेकांना बाहेर हॉटेलमध्ये जाऊन भूक भागवावी लागली. मुख्यालयाच्या आवारात केवळ एकच हातगाडी उभी करण्यात आलेली होती. या हातगाडीवर वडापाव आणि चहा व्यतिरिक्त दुसरे खाद्यपदार्थच उपलब्ध नव्हते.घरची गरीब परिस्थिती असल्यामुळे अनेकांना नोकरीची अपेक्षा आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये सध्या केवळ पोलीस खात्यातच दर वर्षी मोठ्या प्रमाणावर भरती असते. त्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागामधूनही शेकडो तरुण प्रयत्न करतात. अंगावर मळलेले, फाटके कपडे, पायांत चपला, सँडल, रिकामे खिसे अशा परिस्थितीत अनेक जण भरतीसाठी आल्याचे विदारक चित्र होते. अनेक जण अनवाणी व चपला घालूनच पळण्याचा सराव करीत होते. ग्रामीण भागातून आलेले तरुण मुख्यालयातील साधनांचा वापर करून पुलअप्सचा सराव करताना दिसत होते.
पोलीस भरतीच्या सुविधांमध्ये ‘पुणे उणेच’
By admin | Published: June 15, 2014 3:54 AM