पुणे : आरोग्य विभाग पेपर फुटीमध्ये अटक केलेला मुंबई नेव्हल डॉकयार्डमधील खलाशी प्रकाश मिसाळ हा पेपर फोडणाऱ्या एजंटांशी संपर्कात असून हे एजंट टीईटी परीक्षा (शिक्षक पात्रता परिक्षा), पोलीस भरती परीक्षा ई परीक्षांचे फुटलेले पेपर मिळविणाऱ्यांशी संपर्कात होते. त्याने आरोग्य विभाग गट डचा पेपरव्यतिरिक्त अन्य कोणकोणत्या परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवून ते परीक्षार्थीमध्ये वितरित केले आहेत, याचा तपास सायबर पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामुळे आरोग्य, म्हाडाबरोबरच आता टीईटी परीक्षा, पोलीस भरती परीक्षांचे पेपरही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी अटक केलेल्या चारजणांची सोमवारी (दि.१३) पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.खलाशी प्रकाश मिसाळ, सहसंचालक महेश बोटले, परीक्षार्थी नामदेव करांडे आणि उमेश मोहिते अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. प्रकाश मिसाळ हा मुंबईत खलाशी म्हणून काम करतो. त्याला नातेवाईक शिक्षक नागरगोजे याच्याकडून पेपर मिळाला होता. मिसाळ हा एजंट विशाल गोसावी, नागरगोजे, जायभाय व बुढे यांच्या संपर्कात होता. हे एजंट टीईटी परिक्षा, पोलीस भरती परीक्षा ई परीक्षांचे फुटलेले पेपर मिळविणाऱ्यांशी संपर्कात होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नागरगोजे याला राजेंद्र सानप याच्याकडून गट डचा पेपर मिळाला होता. तो त्याने पिंपरी चिंचवडमधील दोघा एजंटांना पुढे दिला होता. हे दोन्ही एजंट अद्याप फरार आहेत. महेश बोटले याने गट क व ड चा पेपर असलेला पेनड्राईव्ह एका लिफाफ्यात ठेवून तो शिपायामार्फत प्रशांत बडगिरे याच्या चालकाकडे दिल्याचे उघड झाले आहे. उमेश मोहिते व नामदेव करांडे यांना प्रशांत बडगिरे याच्या माणसाकरवी लॉजवर लाखो रुपये दिल्यावर पेपरची हार्डकॉपी प्राप्त झाली होती. तो पेपर पोलीस हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.