पुणे : भुकंपग्रस्त नसताना बनावट कागदपत्रे सादर करुन भुकंपग्रस्त कोट्यातून पोलीस भरती होऊन शासनाची फसवणूक केलेल्या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई गोविंद मधुकर इंगळे असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. सध्या त्याची शिवाजीनगर मुख्यालयात नेमणूक आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रविण संपतराव अब्दागिरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२१ पासून घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई भरती घेतली होती. त्यात गोविंद इंगळे याने भुकंपग्रस्त कोट्यातून अर्ज केला होता. त्यात त्याची निवड झाली. त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यावर त्याने बनावट कागदपत्र सादर करुन भुकंपग्रस्त कोट्यातून नोकरी मिळविल्याचे दिसून आल्यावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.