पुणे : मूळची नांदेड येथील, पण कामानिमित्त आई-वडिलांबरोबर नवी मुंबईत आलेल्या व तेथून बेपत्ता झालेल्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोल्हापूर येथील कुंटणखान्यातून सुटका केली़याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे़ रूपाली पटेल आणि गौरव अशी त्यांची नावे आहेत़ याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़याबाबतची माहिती अशी : मूळची नांदेड येथील एक मुलगी आई-वडिलांबरोबर नवी मुंबईत राहायला आली होती़ तेथे तिची राधाबाई पाटील (रा़ चिंचपाडा, नवी मुंबई) हिच्याशी सोनी या तरुणीच्या मदतीने ओळख झाली़ तिने तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले़ त्यानंतर तिची रवानगी पुण्यात सिमरन, काजल यांच्याकडे करण्यात आली होती़पालकांच्या तक्रारीनंतर सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शीतल भालेकर, संपत पवार, चंद्रकांत जाधव, प्रमोद म्हेत्रे, रमेश लोहकरे, संजय गिरमे, नामदेव शेलार, ननिता येळे, गीतांजली जाधव, कविता नलावडे, राजेंद्र कचरे, सचिन शिंदे, नितीन तेलंगे, सचिन कदम, सरस्वती कागणे, रूपाली चांदगुडे या पथकाने या फोन कॉलच्या धाग्यावरून तिचा शोध सुरू केला़ तेव्हा ती कोल्हापूर येथे असल्याचे समजले़ त्यानंतर कोल्हापूरमध्ये तिचा शोध घेऊन सुटका करून तिला पुण्यात आणले़अटक केलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, मुलीला रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले़चार महिन्यांपूर्वी एका वेटरच्या मदतीने या अल्पवयीन मुलीने आपल्या आईला फोन केला होता़ हा फोन पुण्यातून आल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी येथे येऊन सामाजिक सुरक्षा विभागात तिचा शोध घेण्याची विनंती केली़ त्यानंतर पोलिसांनी कॉल रेकॉर्डवरून तपास सुरू केला.
पोलिसांकडून अल्पवयीन मुलीची सुटका, नवी मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर अशी झाली होती फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 2:53 AM