पिंपरी: गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसाशी झटापट करून करून शर्ट फाडल्याचा निंदनीय प्रकार हिंजवडी येथील वांगदरे वस्तीत घडला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
भवानी ओमप्रकाश चंडालिया (वय ३८, रा. पिंपरी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक सुरेश उत्तम जायभाये यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडालिया हा गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वागदरे वस्ती, हिंजवडी येथे सापळा रचून ही कारवाई केली. त्यावेळी आरोपी चंडालिया हा ११ हजार ५५० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी जवळ बाळगताना सापडला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करत असताना त्यांनी जायभाये व त्यांच्यासोबत असलेल्या स्टाफशी अरेरावी करून धक्काबुक्की केली. तसेच त्यांना झटापट करून त्यांचे टीशर्ट फाडून जोरात धक्का दिला. पोलीस करत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.