धायरी : कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त पसरू नये, ह्यासाठी नागरिकांनी आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, तसेच सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी ' शारीरिक अंतर ' पाळून दैनंदिन व्यवहार करावेत यासाठी सिंहगड रस्ता पोलिसांच्या वतीने शुक्रवारी प्रमुख रस्त्यांवरून 'सशस्त्र रूट मार्च' काढण्यात आला.यावेळी सकाळी नऊ वाजल्यापासून हिंगणे बुद्रुक येथून संचलनास प्रारंभ झाला. त्यानंतर वडगांव बुद्रुक, जाधवनगर, नऱ्हे, तसेच सिंहगड रस्ता आदी परिसरात कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्ता पोलिसांच्या वतीने संचलन करण्यात आले.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे, बालाजी साळुंखे,अर्चना बोधडे, प्रशांत कणसे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, नितीन जाधव यांच्यासह सीआयएफएस, सीआरपीएफ, एसआरपीएफ, तसेच पोलीस व होमगार्ड व सशस्त्र जवानांचा सहभाग होता. सिंहगड रस्ता परिसराला छावणीचे रूप आले होते. कोरोना विरुद्धच्या लढाईत पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या रूट मार्चने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी संचलनाचे नेतृत्व केले. संचालनासाठी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नऱ्हे ग्रामपंचायतीचे सदस्य सुशांत कुटे, तेजस कुटे आदी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. संचलनासाठी एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस दिसल्याने बरेच नागरिक आपल्या मोबाईलमधून पोलिसांचे फोटो काढत होते, तर काही जण पोलिसांना 'सॅल्यूट' करत होते.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ' भारत माता की जय ' चा नारा दिला.
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सिंहगड रस्त्यावर पोलिसांचे संचलन;‘भारत माता की जय’घोषणा देत नागरिकांकडून 'सॅल्यूट'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 12:54 PM