पुणे : नेटच्या परीक्षेत तीनदा अपयश आल्यानंतरही यंदा अभ्यास न झाल्याने आत्महत्या करण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या तरुणीचा फरासखाना पोलिसांनी तातडीने शोध घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन केले़. अभ्यास झेपत नसेल तर दुसरा एखादा कोर्स कर, असे सांगून पोलिसांनी तिचे समुपदेशन केले व पालकांनाही तिच्यावर दबाव न टाकण्यास सांगितले़. पोलिसांच्या प्रयत्नामुळे एक घर उध्वस्त होण्यापासून बचावले़. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा पेठेतील एका महिला गुरुवारी दुपारी साततोटी पोलीस ठाण्यात आली व तिने आपल्या २० वर्षांच्या मुलीने लिहिलेली चिठ्ठी दाखविली़. त्यात चिठ्ठीत तिने मी जीवाचे बरेवाईट करणार असून घरातून निघून जात असल्याचे लिहिले होते़. पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांनी त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांना सांगितली़. पोलिसांनी अधिक माहिती घेतली़, तेव्हा ही तरुणी नेटच्या परीक्षेचा अभ्यास करत होती़ तीन वेळा तिने परीक्षा दिली होती़. पण, त्यात तिला यश आले नव्हते़ यंदाही तिचा अभ्यास झाला नव्हता, त्यामुळे तणावाखाली ती घरातून जाताना आईचा मोबाईल घेऊन बाहेर पडली होती़. ही माहिती समजताच पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासण्यास सुरुवात केली़. तेव्हा मोबाईल बंद आढळला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन माहिती काढली. तेव्हा रात्री ९ वाजता ती सिंहगड किल्ल्याच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली़. पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे व त्यांचे सहकारी, तिचे आईवडील तातडीने सिंहगड किल्याच्या परिसरात तिचा शोध घेऊन लागले़. तेव्हा तेथील बसस्टॉपवर गर्दी दिसली़. त्यात ही तरुणी दिसली़. तिला पोलीस ठाण्यात आणल्यावर विचारपूस केली़ तेव्हा तिने सांगितले की, अभ्यास नीट न झाल्याने माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला. आईचा मोबाईल घेऊन सिंहगड किल्ल्यावर जाण्यास निघाले़. शनिवारवाड्याहून पीएमपी बसने सिंहगड येथे आले़ तोपर्यंत रात्र झाली होती़. त्यामुळे डोंगरा येथील मंदिरात बसून होते़. रात्री उशीर झाल्याने परत जाणारी शेवटची बस पण गेली होती़ तेथे लोक जमले़ तेवढ्यात पोलीस व आईवडील आले, असे तिने सांगितले़. किशोर नावंदे यांनी या तरुणीला समजावून सांगितले की, तुला अभ्यास झेपत नसेल तर दुसरा कोर्स कर व आई वडिलांनाही सांगितले की, मुलीवर दबाव आणू नका़ तिला जो अभ्यासक्रम आवडतो़ तो तिच्याकडून करुन घ्यावा़. यावर ती तरुणी स्वखुशीने तयार झाली़. आईवडिलांनीही तिने नेटची परीक्षा द्यावी म्हणून आम्ही दबाव टाकणार नाही़, तिला जे आवडते तो कोर्स तिने करावा़. आम्ही तिच्या पाठीशी आहोत, असे मान्य केले़. दोघांचेही समुपदेशन केल्यानंतर तरुणी आपल्या आईवडिलांबरोबर घरी गेली़. आईवडिल व मुलीकडून जी अपेक्षा करतो़. त्यामुळे मुलांना टेन्शन येऊन ती आत्महत्येपर्यंत टोकाची भूमिका घेतात़. पोलिसांनी तातडीने शोध घेतल्याने ती पुन्हा आपल्या कुटुंबात परतू शकली़.
अभ्यास न झाल्याने आत्महत्येच्या इराद्याने गेलेल्या तरुणीचा पोलिसांकडून तातडीने शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 2:32 PM
कसबा पेठेतील एका महिला गुरुवारी दुपारी साततोटी पोलीस ठाण्यात आली व तिने आपल्या २० वर्षांच्या मुलीने लिहिलेली चिठ्ठी दाखविली़..
ठळक मुद्देसमुदेशनाने मतपरिवर्तन