पुणे : बिर्ला कंपनीच्या रिकाम्या सिमेंटच्या पोत्यामध्ये पेन्ना कंपनीचे सिमेंट भरून ते ग्राहकांना विकणा-या टोळीचा पर्दाफाश करून बनावट सिमेंटतयार करणा-या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. संघटित विरोधी पथकाने ही कारवाई करून याप्रकरणी पाच जणांना अटक केली. घटनास्थळावरून 1603 बनावट सिमेंटच्या गोण्या, दोन टाटा आयशर टेम्पो आणि इतर साहित्य असा 19 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.चौधरी एंटप्रायझेसचे मालक अन्वर हुसेन शेख (वय 50, रा. कुमार पर्णकुटी, फ्लँट नं 26, भाजीमार्केटजवळ, लोकसेवा चौक, येरवडा), मॅनेजर रमाकांतराजकुमार पांडे (वय-40 रा. चौधरी एंटरप्रायझेस गोडाऊन सातवनगर, हांडेवाडी, हडपसर, पुणे मूळगाव तालुका लबुवा, जि.सुलतानपूर, उत्तरप्रदेश), कामगार श्यामकुमार कल्लू कोळी (19 रा. सदर व मूळ गाव रामगंज ता.सुलतानपूर जि.अमेठी, उत्तरप्रदेश), अमरनाथ रामखिलावत कोळी(वय-34 रा. सदर व मूळ गाव अमेलिया कला ता.जि सुलतानपूर, उत्तरप्रदेश) आणि शिवपूजन भोलुप्रसाद प्रजापती (वय-40 रा. सदर व ग्राम व पोस्ट डिया ता. कुंडा, जि.प्रतापगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर आणले असता आठ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांना खब-याकडून मिळालेल्या माहितीनुसार सातवनगर, हांडेवाडी रस्ता येथील चौधरी एंटरप्रायझेस याठिकाणी छापा टाकला असता आरोपी हा पेन्ना कंपनीचे हलक्या दर्जाचे ( राखेचे जास्त प्रमाण असलेल्या) सिमेंट बिर्ला सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात भरून ग्राहकांची फसवणूक करताना आढळले. त्यांच्यावर कॉपीराईट आणि ट्रेडमार्क कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उप निरीक्षक पी. डी. गायकवाड, कर्मचारी नरेंद्र सोनावणे, राज देशमुख, रमेश भिसे, प्रदीप शेलार, भालचंद्र बोरकर, हजरत पठाण, अतुल मेंगे, तानाजी गाडे, विठ्ठल बंडगर, किरण चोरगे, दत्ता फुलसुंदर, कांतीलाल बनसुडे, शीतल शिंदे यांच्या पथकाने केली.
बनावट सिमेंट तयार करणा-या अड्ड्यांवर पोलिसांनी टाकला छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 8:36 PM