वारजे : ब्रिटिशकालीन पोलिसांची तत्कालीन नागरिकांना भीती वाटायची. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही तशी परिस्थिती काही प्रमाणात कायम आहे. यात बदल घडवून पोलीस ठाण्याकडे समाजासाठी मदत केंद्र म्हणून पाहण्याची गरज आहे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. खडकवासला (उत्तमनगर) पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, पोलीस आयुक्त सतीश माथूर, अपर आयुक्त संजय कुमार, चंद्रशेखर दैठणकर, अब्दुल रेहमान, सहआयुक्त शहाजी सोळुंके, सहायक आयुक्त अरविंद पाटील, निरीक्षक सूयर्कांत पवार, गणपत पिंगळे, विजय देशमुख, कल्लापा पुजारी आदी उपस्थित होते. उत्तमनगरच्या सरपंच सुमन पंडित या मात्र व्यासपीठाखाली सातव्याआठव्या रांगेत बसल्या होत्या. बापट म्हणाले, की जास्त पोलीस असणे हेदेखील समाजाला भूषवाह नाही. नुसतीच त्यांची संख्या वाढवूनही प्रश्न सुटत नाहीत. समाजाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सामाज व पोलीस एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जावे. पोलीस समजाचाच एक घटक आहे, ही भावना रुढीस लागली पाहिजे. ‘पीएमआरडीए’च्या माध्यामातून जिल्ह्यासाठी व खडकवासलासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाहीही यांनी दिली. आमदार तापकीर म्हणाले, की पोलीस ठाण्याची हद्द ४० किमीपर्यंत लांब आहे. त्यामुळे जसे सिंहगड पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या कमी आहे, त्याचप्रमाणे इथेही कमी आहे. त्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे. (प्रतिनिधी)1 खडकवासला व उत्तमनगरच्या नावाच्या गोंधळाबाबत बापट म्हणाले, की ज्याप्रमाणे मुलाचे पाळण्यातील नाव व बोली भाषेतील नावे वेगळी असतात; तसेच या पोलीस ठाण्याच्या नावाबाबत झाले आहे. नाव जरी खडकवासला असले, तरी पोलिसांनी पाठविलेल्या उत्तमनगर नावाचा प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्य करून आणू. 2 आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत बापट म्हणाले, कार्यकर्तादशेत आपणास अनेकदा अटक झाली होती. त्या वेळेस पत्नी - आपण कुठल्या चौकीत आहोत, हे पाहायला येत असे. आज तिला मुद्दाम कार्यक्रमाला आणले आहे व आज अटक नाही वेगळेच नाटक आहे, असे म्हणताच हशा पिकला.
पोलीस ठाणे मदत केंद्र व्हावे
By admin | Published: April 05, 2015 12:46 AM