पुणे : पुण्यातील महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण Pooja Chavan suicide या २२ वर्षीय तरुणीने रविवारी मध्यरात्री तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. मात्र पूजेच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. राज्य सरकारमधील 'त्या' कथित मंत्र्यासोबतच्या प्रेमसंबंधात निर्माण झालेल्या तणावातूनच या तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने उचलून धरली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील पूजेच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि. ११) पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले,पुण्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली ही बातमी मी वाचली आहे. या प्रकरणात राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा सहभाग असल्याची चर्चा आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. या प्रकरणात तात्काळ कारवाई करून पोलिसांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी. तसेच या प्रकरणातले सत्य जनतेसमोर आणावे. एका तरुणीची अशाप्रकारे झालेली आत्महत्या आणि त्याच्याभोवती निर्माण झालेले संशयाचं वर्तुळ आहे ते दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी करता कामा नये.
अठ्ठेचाळीस तास उलटून देखील या प्रकरणी पोलिस कारवाई का करत नाहीत... पुण्यातल्या एका तरुणीने आत्महत्या केली आहे. तिच्या मोबाईलवरुन स्पष्ट होते आहे की तिचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी प्रेमसंबंध होते. त्यात झालेल्या तणावातुनच तिने आत्महत्या केली. पण अठ्ठेचाळीस तास झाले तरी यात गुन्हा नोंदवला गेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की यात नातेवाईकांची तक्रार नाही. पण मग पोलीस सुमोटो पद्धतीने गुन्हा का दाखल करत नाही ? की राज्यात कायदा हा विषयच संपला आहे ?असा सवाल पाटील यांनी उपस्थित करतानाच तुम करे सो कायदा असेच सर्व चालले आहे.