Pune Crime : पुण्यात एका वृद्धाच्या खुनाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी धक्कादायकरित्या उलघडा केला आहे. पुण्यातील इंदापूर येथील स्मशानभूमीत मृतदेह पूर्णपणे जाळल्यानंतर दोन टूथ कॅप आणि तीन चाव्या सापडल्या होत्या. तसेच चितेजवळील लाकडावर रक्ताचे डाग सापडले होते. त्यामुळे हा सगळा प्रकार गावातील लोकांना संशयास्पद वाटला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. जवळपास इतर कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना, पुणे ग्रामीण पोलिसांनी ७४ वर्षीय निवृत्त लष्करी जवानाच्या निर्घृण हत्येचे गूढ उलगडले आहे. एका महिलेशी गैरवर्तन केल्यामुळे निवृत्त लष्करी जवाना ठार मारण्यात आले होते.
१६ नोव्हेंबर रोजी सकाळी संपूर्ण पोलिस यंत्रणा निवडणुकीच्या तयारीत असताना पुणे ग्रामीण पोलिसांना इंदापूर येथील तावशी गावातील स्मशानभूमीत एक मृतदेह संशयास्पदरित्या जाळल्याची माहिती मिळाली होती. मृतदेहाशेजारी मातीवर रक्ताचे डाग पडलेले होते. जितेजवळ पडलेल्या लाकडावर तसेच काही अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते. पोलीस पाटलांनी या सगळ्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कोणतेही धागेदोरे हाती नसताना तपास करुन या खुनाच्या गुन्ह्याचा उलघडा करण्यात आला आहे.
स्मशानभूमीत हाडं सापडल्यानंतर पोलिसांना आजूबाजूच्या परिसरात कोणचाही मृत्यू न झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे संशयित खून म्हणून पाहण्यास सुरुवात केली. रक्ताचे नमुने गोळा करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले. सरणावरील शरीर पूर्णपणे जळाले होते. फक्त दोन दातांच्या कॅप आणि तीन चाव्या सापडल्या होत्या. तसेच काही न जळलेली लाकडे होती. ती लाकडे कारंजा नावाच्या एका विशिष्ट झाडाचे असल्याचे पोलिसांना आढळले.
तपासादरम्यान, पोलिसांना कळलं तावशी येथील स्थानिकांनी स्मशानभूमीजवळ एक पिकअप ट्रक पाहिला होता. त्यानंतर वालचंदनगर पोलिस ठाणे आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास सुरू केला. पोलिसांचे पथक इंदापूर आणि शेजारच्या सोलापूरमधील माळशिरस आणि साताऱ्यातील फलटण या तालुक्यांतील डझनभर वखारींमध्ये गेले होते.
शेवटी फलटण तालुक्यातील गुणवरे गावातील एका वखारीच्या मालकाने पिकअप ट्रकमध्ये आलेल्या दोन व्यक्तींनी कारंजा झाडाचे लाकूड विकत घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर फलटण येथील गोखली गावातून दादासाहेब मारुती हरिहर (३०) आणि विशाल सदाशिव खिलारे (२३) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या महिन्याच्या सुरुवातीला हरिहर आणि त्याची पत्नी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील हरिभाऊ धुराजी जगताप (७४) यांच्या घरी गेले होते. त्यावेळी जगताप यांनी हरिहरच्या पत्नीशी गैरवर्तन केले. त्यानंतर हरिहरने जगताप यांनी केलेल्या कृत्याचा राग मनात धरला होता. १५ नोव्हेंबर रोजी हरिहर आणि त्याचा मित्र विशाल खिलारे यांनी जगताप यांना सातारा येथील माण तालुक्यातील सातोबाच्या यात्रेला येण्यास सांगितले. नंतर त्यांनी जगताप यांना तावशी येथे आणले. त्यानंतर दोघांनी लाकडाने वार करत जगताप यांची हत्या केली आणि फलटण येथून लाकडे आणल्यानंतर स्मशानभूमीत त्यांचा मृतदेह जाळला.
“जगताप फार पूर्वीच लष्करातून निवृत्त झाले होते आणि सुमारे १० वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. ते गंगाखेडमध्ये एकटेच राहत होते. कोल्हापुरात राहणाऱ्या त्यांच्या मुलाने दाताची कॅप आणि स्मशानात सापडलेली चावी ओळखली. आम्ही हरिहरकडून जगतापने घातलेले सोन्याचे लॉकेटही जप्त केले आहे. स्मशानात हाडं सापडल्यानंतर तीन दिवसांनी हरिहर आणि खिलारे यांना अटक करण्यात आली," अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.