पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्कृष्ट सेवेकरीता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक नानजीव येथील पीटीएसचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे यांना मिळाला असून गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी, सहायक फौजदार पांडुरंगृ वांजळे, विजय भोंग आणि दहशतवाद विरोधी पथकातील सहायक फौजदार काशिनाथ उभे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत रामभाऊ गुंडगे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यापूर्वी त्यांना २०१५ यावर्षी पोलीस दलात उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले होते, तर २०२२ या वर्षाकरिता पुन्हा त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. चंद्रकांत गुंडगे हे सांगली जिल्ह्यातील पलूस या गावचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण दौंड येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण शेठ ज्योती प्रसाद विद्यालयात झाले आहे. उच्च पदवीचे शिक्षण त्यांनी बारामतीत घेतले आहे. गेली ३७ वर्षे ते पोलीस सेवेत आहे. १९८४ ला ते पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाले. मजल दरमजल करीत त्यांनी वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत मजल गाठली आहे. पुणे शहर आणि ग्रामीण, ठाणे या ठिकाणी कामकाज करीत असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक, पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह, केंद्र शासनाच्या गृह विभागाचा आदर्श प्रशिक्षक पोलीस म्हणून पुरस्कार मिळाले. आजपावेतो सव्वातीन लाख रुपयांचे रोख रक्कम पुरस्कारदेखील पोलीस दलात मिळालेले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरीयांचे वडिलही पोलीस दलात कार्यरत होते. ते विशेष शाखेत २ जून १९८७ मध्ये पोलीस काँस्टेबल म्हणून भरती झाले. त्यांनी भोसरी, लष्कर, अलंकार, फरासखाना, गुन्हे शाखा तसेच पोलीस सह आयुक्त कार्यालयात काम केले आहे. त्यांना आतापर्यंत २३९ बक्षिसे मिळाली आहेत. मानवी तस्करीच्या ११ गुन्ह्यात लेखनिक म्हणून काम केले. त्यातील ३ गुन्ह्यात ५ वर्षे शिक्षा झाली आहे. २०११ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह मिळाले आहे.
सहायक फौजदार विजय भोंग हे मुळचे इंदापूर तालुक्यातील केतकी गावचे आहेत. ते १ एप्रिल १९९० मध्ये पोलीस दलात भरती झाले. त्यांनी राज्य राखीव पोलीस दल १, लष्कर, मार्केटयार्ड, विशेष शाखा येथे काम केले आहे. कोरेगाव पार्क येथील कपिला मेट्रीक्स उच्चभ्रु भागात जुगार अड्ड्यावर छापा घालून १ कोटी १४ लाख रुपयांचा माल जप्त केला. त्यात मोलाची कामगिरी केली. त्यांना पोलीस महासंचालक यांचे २०२१चे सन्मान चिन्ह मिळाले. त्यांना २२२ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांचे वडिलही शहर पोलीस दलात होते.
सहायक फौजदार पांडुरंग वांजळे हे खंडणी विरोधी पथकात कार्यरत असून संदीप मोहोळ खून प्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात मोलाची कामगिरी केली. आर्मी भरती पेपरफुटीमध्ये २ आरोपींना दिल्लीहून अटक करणाऱ्या पथकाचा त्यांचा समावेश होता. १५ खून, ७ जबरी चोरी, ५ पिस्तुल बाळगणारे, ५ चैनचोर, ७७ घरफोडी, ९४ वाहनचोरी गुन्ह्यांच्या शोधात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. त्यांना २५० बक्षिसे मिळाली आहेत. सहायक फौजदार काशिनाथ उभे हे १९९० मध्ये पोलीस दलात भरती झाले असून त्यांना २३४ बक्षिसे मिळाली आहेत. ३ बांगला देशी नागरिक, ३ पाकिस्तानी एजंट यांना पकडण्यात त्यांचा सहभाग होता.