बारामती पोलीस ठाण्याला 'पोलीस स्टेशन ऑफ द मंथ' पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 07:34 PM2021-03-01T19:34:59+5:302021-03-01T19:36:01+5:30
बारामती तालुका पोलीस स्टेशनची जानेवारी २०२१ साठी सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड करण्यात आली आहे
बारामती : पोलीस ठाण्यातील सर्वच कामांत उत्कृष्ट कामगिरी बजावल्या बद्दल पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून बारामती तालुका पोलीस ठाण्याची निवड करून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना पोलीस स्टेशन ऑफ द मंथ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस ठाण्यास पोलीस स्टेशन ऑफ द मंथ ( सर्वउत्कृष्ट पोलीस स्टेशन) हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. हा पुरस्कार हा गुन्हे उघडकीस आणणे, चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करणे, फरार आरोपी शोधणे,आरोपींना शिक्षा लागणे, अवैध हत्यार पकडणे, पासपोर्ट, मुद्देमाल निर्गती, तक्रारी अर्जाची निर्गती, वाहतूक कारवाया अशा प्रकारच्या सर्वोत्कृष्ट कारवाया करणाऱ्या पोलीस ठाण्याची निवड पोलीस स्टेशन 'ऑफ द मंथ' म्हणून केली जाते.
गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत बेकादेशीरपणे विक्रीस आणलेले १२ पिस्तूल हस्तगत करण्यात आले होते. याबाबत बारामती तालुका गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, कॉन्स्टेबल नंदू जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोखंडे,राहुल पांढरे यांना बहिर्जी नाईक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
बारामती तालुका पोलीस स्टेशनची जानेवारी २०२१ साठी सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी बारामती तालुका पोलिस स्टेशन हे १८ व्या क्रमांक वर होते. त्यानंतर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पुरस्कार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचा गौरव केला. यावेळी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर व पुणे ग्रामीण दलातील सर्व अधिकारी उपस्थित होते.