पुणे : पोलीस गणवेशात येऊन मुंढवा भागातील तीन हॉटेलमधून खंडणी वसूल करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केल्यानंतर आता मुंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलन कुरकुटे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मुंढवा पोलिसांनी रात्री उशिरा त्याला अटक केली आहे.
मिलन कुरकुटे हा हिंजवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीला होता. गेल्या २१ ऑगस्टपासून तो वैद्यकीय कारणावरून रजेवर होता. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तो आपल्या चारचाकी गाडीतून गणवेशात मुंढव्यातील हॉटेल लोकल गॅसस्ट्रो ॲन्ड बार येथे गेला. हॉटेलचे मॅनेजर मारुती गोरे यांना त्याने ताबडतोब हॉटेल बंद करा, नाही तर मी तुमच्या हॉटेलवर कारवाई करीन, असे जोरजोरात ओरडून सांगू लागला. त्या वेळी मॅनेजरने आता आमच्या हॉटेलमध्ये कोणीही ग्राहक नाही असे सांगितले. तेव्हा त्याने मी पोलीस कमिशन ऑफिसमधून आलो आहे. तुमचे हॉटेल चालू होते. तुमच्यावर कारवाई करावयाची नसेल तर मला २ हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून जबरदस्तीने २ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने हॉटेल वन लॉन्जमध्ये जाऊन २ हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर तो एबीसी रोडवरील हॉटेल कॉनिव्हल येथे गेला. ते हॉटेल बंद असताना मॅनेजर किशोर थापा याला हॉटेल उघडण्यास भाग पाडून त्याच्यावर कारवाईची धमकी देऊन ३ हजार रुपयांची खंडणी जबरदस्तीने घेतली. तसेच त्यानंतर त्याने हॉटेल मेट्रो व हॉटेल धमाका येथे जाऊन त्यांनासुद्धा खंडणीसाठी धमकावल्याचे समजले.
रात्री घडलेल्या या घटनेची माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांना बुधवारी सकाळी समजली. पोलिसांनी हॉटेलचालकांकडे याची चौकशी केल्यानंतर मारुती गोरे यांनी फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून रात्री त्याला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी त्याला तडकाफडकी निलंबित केले. पोलीस उपनिरीक्षक एच. एस. गिरी अधिक तपास करीत आहेत.
फोटो - मिलन कुरकुटे