पुणे : भांडणाच्या कारणावरून कात्रजपोलिस चौकीत येऊन तुझी वर्दी उतरवितो, असा दम देऊन पोलिस उपनिरीक्षकाची कॉलर पकडून त्यांना मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रीतम चुन्नीलाल परदेशी व त्याची आई सुजाता चुन्नीलाल परदेशी (दोघे रा. कात्रज गाव) यांना अटक केली आहे. हा प्रकार कात्रज पोलिस चौकीत सोमवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नितीन तानाजी जाधव (वय ३२) यांनी भारती विद्यापीठ पोलिस चौकीत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय पांडुरंग माळवे (वय २३, रा. कात्रज) याच्याबरोबर आराेपीची भांडणे झाली होती. त्याची एनसी दाखल केली गेली होती. या कारणावरुन आरोपी कात्रज चौकीत आले. मोठमोठ्याने आरडाओरडा करु लागले. तेव्हा रात्रपाळी अंमलदार पोलिस हवालदार जाधव यांनी त्यांना आरडाओरडा करु नका असे सांगितले. त्याचा राग मनात धरून प्रीतम परदेशी याने फिर्यादी यांना ‘तुला आम्ही कोण आहे ते दाखवितो, तुझी वर्दी उतरवितो, माझ्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तू या चौकीला नवीन आहेस, आधी माझी माहिती काढ,’ अशी धमकी देऊन फिर्यादी यांना जोराने ढकलून दिले. त्याची आई सुजाता हिने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. प्रीतम याने त्याच्याकडील फुटलेल्या मोबाईलने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार करुन त्यांना जखमी केले़ पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.