पुणे : पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला ५० हजार रुपयाच्या लाच प्रकरणी पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे शहर पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. शंकर धोंडिबा कुंभारे (४३, पोलिस उपनिरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे) असे या लाचखोराचे नाव असून, त्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले.
याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर शंकर कुंभारे हा विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. त्याच्याकडे एका तक्रारदाराच्या तक्रार अर्जाची चौकशी देण्यात आली होती. तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल न करण्यासाठी पीएसआय शंकर कुंभारे याने तक्रारदाराकडे सुरूवातीला ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. दरम्यान, तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता त्यामध्ये उपनिरीक्षक शंकर कुंभारे याने तडजोडीअंती ३० हजार रूपयांची लाच घेण्याचे मान्य केले. त्यापैकी १५ हजाराची लाच घेताना कुंभारेला एसीबीच्या पथकाने सरकारी पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. त्याच्याविरूध्द विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती एसीबीचे उप-अक्षीक्षक नितीन जाधव यांनी दिली.