पिंपरी : महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधी कारवाईसाठी तयारी केली असून, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अनधिकृत बांधकामांविरुद्धच्या कारवाईसाठी पोलीस आयुक्तांनी महापालिकेला पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, असे आदेश जनहित याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दिले असल्याने बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नाही, त्यामुळे महापालिकेला अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई करता येत नाही, अशी सबब महापालिकेने पुढे केली होती. कधी मनुष्यबळ अपुरे, तर कधी पोलीस बंदोबस्ताचा अभाव ही कारणे महापालिकेकडून दिली जात असल्याने कारवाईत व्यत्यय आला होता. न्यायालयाने याबाबत अत्यंत गंभीर दखल घेतली. अनधिकृत बांधकामांविरुद्धच्या कारवाईसाठी महापालिकेने स्वतंत्र कर्मचारीवर्ग नेमावा, तांत्रिक पदांची भरती प्रक्रिया करून कारवाई सुरू ठेवावी, असे सूचित केल्यामुळे महापालिकेने १३२ पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतला. नुकतीच या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. एकीकडे पदांची भरती, तर दुसरीकडे कारवाईला गती देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडल तीनच्या उपायुक्तांनी महापालिकेला आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रात होणार आहे. त्या त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पोलीस यंत्रणा झाली सज्ज
By admin | Published: April 01, 2015 4:59 AM