पुणे: मुंबईतील ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेल्या किरण गोसावी (kiran gosavi) याला पुणे पोलिसांनी (pune police) फसवणुकीच्या गुन्ह्यात नाट्यमयरित्या अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या सर्व घडामोडीनंतर फरासखाना पोलिसांचे एक पथक किरण गोसावीला घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. त्याच्या घराची आणि कार्यालयाची तपासणी करण्यासाठी पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आले.
दरम्यान पुणे पोलिसांकडे किरण गोसावीने फसवणूक केल्याच्या आणखी चार तक्रारी आल्या आहेत. त्यांची देखील नोकरीच्या आमिषानेच आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. यातील तीन तरुण हे लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तर एक वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशी आहे. त्यांना संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगण्यात आले आहे.
किरण गोसावी याच्यावर 2018 साली फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत चिन्मय देशमुख (वय 22) या तरुणाने तक्रार दिली आहे. परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी तब्बल तीन लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत त्याला 2019 मध्ये फरार घोषित केले होते. तर या गुन्ह्यात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.