बारामती: भाजलेल्या मुलाला कारमधून दवाखान्यात नेणारे वकील आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना बुधवारी (दि २९) सकाळी घडली. याप्रकरणी संबंधित वकीलांनी शहर पोलीसांच्या कर्मचाऱ्याने तुरुंगात टाकण्याची धमकीवजा भाषा वापरल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात केली आहे. या घटनेनंतर बारामती वकिल संघटनेच्या सदस्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली. धमकावणाऱ्या पोलिस कर्मचारी यांचेवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
शहर पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार अॅड. अतुल पोपट भोपळे हे (रा.डोर्लेवाडी,ता.बारामती) त्यांच्या मुलाला ६० टक्के भाजल्याने त्याला कुटुंबियांसह कारमधून उपचारासाठी बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घेऊन गडबडीत निघाले होते. यावेळी ते भिगवण चौकात आले असताना महिला पोलिसांनी त्यांचे वाहन थांबवले. त्यावेळी उपस्थित दोन पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांनी मुलाची परिस्थिती सांगत जावू देण्याची विनंती केली. परंतु मास्क न घातल्याच्या कारणावरून एका कर्मचाऱ्याने त्यांना पावती फाडायला लावली. मात्र, पावती फाडल्यानंतर अॅड. भोपळे यांनी अनेक नागरिक विनामास्क जात असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आणले, त्यावर एका कर्मचारी त्यांच्यावर चिडले. त्यांचे गचुरे पकडत त्यांना पोलिसांच्या वाहनात नेवून बसवले. अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. तुला जेलमध्ये बसवतो मग कायदा कळेल अशी भाषा वापरल्याचे भोपळे यांनी सांगितले.
TET Exam: 'टीईटी’ परीक्षेच्या ताखेत पुन्हा बदल
यावेळी चौकात जमलेल्या नागरिकांनी आजारी मुलाच्या उपचारासाठी त्यांना जावू द्या, अशी विनवणी केली. त्यानंतर पोलिसांच्या वाहनातून भोपळे यांना उतरवण्यात आले. पोलिसांच्या या वागण्यामुळे मुलाला दवाखान्यात घेवून जाण्यास उशीर झाला असून त्यामुळे जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी यांचेविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी अॅड. भोपळे यांनी केली आहे. याबाबत अॅड. भोपळे यांनी पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली आहे.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी महेश इंगळे यांनी सांगितले की, अॅड. भोपळे हे मुलाला घेऊन दवाखान्यात निघाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत वकीलांनी माझी भेट घेतली आहे. त्यांचा तक्रारी अर्ज देखील मिळाला आहे. या पार्श्वभुमीवर चौकशी करण्यात येईल. विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर पोलीसांकडून कारवाई सुरु आहे. यावेळी हा कारवाई सुरु असताना हा प्रकार घडला.
वकिल हा देखील कायद्याचा एक भाग आहे. त्यांच्या मुलाला गंभीररित्या भाजले असताना त्यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. आम्हाला तक्रार देण्यासाठी एक तास ताटकळत ठेवले आहे. पोलिसांच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो. झालेली घटना निंदनीय आहे. - अॅड. चंद्रकांत सोकटेअध्यक्ष बारामती वकिल संघटना