पुणे : कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदीचे आदेश शहरात लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरासह परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देखील विनाकारण रस्त्यावर आव्हाने घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाण मात्र कमी होत नाही. यावर उपाययोजना म्हणून संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे.
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची तब्बल 1055 वाहने पाेलिसांनी जप्त केली आहेत. तर बाराशे नागरिकांना नाेटीस देखील देण्यात आली आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमिवर विश्रांतवाडी पाेलिसांनी केलेली ही कारवाई सर्वात माेठी कारवाई म्हणावी लागेल. विश्रांतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील साप्रस चौकी, विश्रांतवाडी मुख्य चौक, भरत ढाबा धानोरी, बोपखेल चौक सह विश्रांतवाडी हद्दीतील प्रमुख मार्गांवर व चौकांमध्ये वेळोवेळी नाकाबंदी करून या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध प्रकारच्या दुचाकीसह बुलेट, ऑटो रिक्षा, टेम्पो, चार चाकी कार यांच्यासह खाजगी वाहनांचा देखील समावेश आहे. नागरिक या ना त्या निमित्ताने विनाकारण रस्त्यावर येतात. भाजी खरेदी, किराणामाल यांच्यासह मेडिकल मधून औषधे घेण्यासाठी जास्त लोक बाहेर पडत आहेत. बहुतांश नागरिक खोटी व चुकीची माहिती देऊन विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस कारवाई करत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या जुन्या चिठ्ठ्या घेऊन बरेच नागरिक रस्त्यावर येत आहेत. विश्रांतवाडी पोलिसांनी सातत्याने केलेल्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये आजाराबद्दल गांभीर्य वाढले असून मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त केल्यामुळे अनावश्यक नागरिक रस्त्यावर येणे बंद झाले आहेत.
सुरुवातीच्या काळात दोन ते तीन दिवसांनंतर जप्त केलेली वाहने सोडण्यात येत होती. मात्र आजाराचा संसर्ग वाढत असून देखील नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत होते. यावर उपाययोजना म्हणून संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये स्थानिक राजकीय पुढारी, नगरसेवक, आमदार तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख सांगत मध्यस्थाकडून गाड्या सोडवण्यासाठी विनंती वजा दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र विश्रांतवाडी पोलिसांनी कोणालाही न जुमानता कारवाया सुरू ठेवत जप्त केलेली वाहने ताब्यातच ठेवली आहेत. जप्त करण्यात आलेली वाहने संचारबंदी संपल्यानंतर म्हणजेच तीन मे नंतर मिळणार आहेत असे पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांनी स्पष्ट केले.