पुणे : संविधानदिनी सरकारने पाेलिसांना हाताशी धरून अारक्षणाचा मुद्दा भरकटावा या उद्देशाने मराठा अारक्षणासंदर्भातल्या पुण्यातील प्रमुख संघटनांच्या महत्त्वाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. संविधान दिनीच असंवैधानिक मार्गाने पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा अाराेप संभाजी ब्रिगेडकडून पत्रकार परिषदेत करण्यात अाला अाहे. याच्या निषेधार्थ बुधवारी शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकार विराेधात अात्मक्लेश अांदाेलन करण्यात येणार अाहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात 16 नोव्हेंबरपासून सुरू झालेली संवाद यात्रा 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई विधानभवनावर येऊन पोहोचणार हाेती. मराठा आरक्षणासह इतर मागण्या तडीस लावण्यासाठी व मान्य केलेल्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी वाहन मोर्चा काढण्यात येणार हाेता. 26 नाेव्हेंबरच्या अादल्या दिवशीच रात्री बारा वाजता मराठा कार्यकर्त्यांना कुठलीही सूचना व लेखी नाेटीस न देता ताब्यात घेण्यात अाले. ही कारवाई सरकारने सुडबुद्धीने पाेलिसांना सूचना देऊन असंवैधानिक मार्गाने केल्याचा अाराेप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येत अाहे. मराठा किंवा धनगर अारक्षण देण्याची सरकारची नियत नाही असे दिसते. जाणीवपूर्वक दाेन समाजात अथवा समूहात वाद पेटवून त्याचे खापर प्रमुख कार्यकर्त्यांवर फाेडण्याचा सरकारचा डाव असल्याचा अाराेपही या परिषदेत करण्यात अाला. दरम्यान बेकायदेशीर ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अात्मक्लेश अांदाेलन ब्रिगेडकडून करण्यात येणार अाहे.