नारायणगाव : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य व्यक्तीला ( दि . १२ ) अटक करून त्यांचे कडून ३० हजाराचा गुटखा , तंबाखू आणि ३ लाख ५० हजार रुपये किमतीची स्विफ्ट कार सह ३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला , अधिक तपासात आळेफाटा येथील गुटखा व्यापा-याला काल रात्री उशिरा अटक केली,अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली आहे. पोलीस पदाचा गैरवापर करून ड्रेसवरच गुटखा वाहतूक करणारा पोलीस आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस धवडे हा शिरूर पोलिस ठाण्यात रात्र गस्तीवर नेमणुकीस होता,असे ही तपासात उघड झाले आहे .पोलीस कॉन्स्टेबल किशोर ज्ञानदेव धवडे , बक्कल नं ११३९ , शिरुर पोलीस ठाणे व हनिफ इंब्राहमभाई तांबोळी (वय ५७) रा. शिरूर भाजीबाजार , ता. शिरुर जि. पुणे या दोघांवर भा.दं.वि. २७२, २७३,१६८,१८८,२६९,२७० व कोविड १९ उपाय योजना २०२० नियमानुसार , साथीचे रोग प्रतिबंधक का १८९७ क २,३,४ तसेच आप्पती व्यवस्थापन २००५ ,५१/२ आणि अन्नसुरक्षा आधिनियम २००६ क २६ (२), २६ (४) ३० (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद मांजरवाडीचे पोलीस पाटील सचिन किसन टाव्हरे यांनी दिली आहे. पोलिसांनी आळेफाटा येथील गुटखा विक्रेता इरफान मोमीन यास काल रात्री ११. ४९ वा . अटक केली, या सर्वाना जुन्नर न्यायालयात हजर केले असता या सर्व आरोपींना जामीन मंजूर केला .
याबाबत घोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,मांजरवाडी हद्दीत नाकाबंदी करून चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे, या चेकपोस्टवर पोलीस पाटील सचिन किसन टाव्हरे कृषी अधिकारी खेडकर , एसटी महामंडळाचे संतोष रोकडे , गजानन रोकडे , वनविभागाचे दशरय डोके व होमगार्ड अक्षय मुळे हे कार्यरत होते , दि. १० रोजी रात्री १०.३० सुमारास जाधववाडी बाजुकडुन एक लाल रंगाची विना नंबर प्लेट असलेली स्विफ्ट कार येताना दिसली म्हणुन तिला थांबवीली असता या स्विफ्ट कार मध्ये मध्ये खाकी ड्रेस घातलेला एक पोलीस कर्मचारी व त्याच्या शेजारी एक मुस्लीम समाजाचा मौलाना बसलेला होता . त्यांना तुम्ही कोठे चालले आहेत असे विचारले असता त्यांनी आम्ही जेवण करण्यासाठी चाललो आहे असे सांगितले व ते नारायणगावच्या दिशेने निघून गेले . मात्र ते जात असताना मौलाना यांच्याकडे पोलीस पाटलांनी पहिले असताना त्यांना संशय आला . त्यांनी हि बाब सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना सांगितली .
त्यानंतर पुन्हा दि. ११ मध्यरात्री १२.३० सुमारास लाल स्वीफ्ट गाडी नारायणगाव बाजुने जोरात येताना दिसली . ती गाडी नारायणगावहुन मांजरवाडी मार्गे शिरूर कडे जात असताना मांजरवाडी येथे नाकाबंदी दरम्यान गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस कॉन्स्टेबल किशोर धवडे याने गाडी न थांबविता जोराने जाधववाडी बाजुच्या रस्त्याचे दिशेने निघुन गेले . पोलीस पाटील सचिन टाव्हरे यांनी तात्काळ पुढे काही ग्रामस्थांना मोबाईल वरून माहिती देऊन गाडीचा पाठलाग सुरु केला असता ग्रामस्थांनी भरघाव वेगाने येणाऱ्या कारला अडविण्यासाठी रस्त्यावर येऊन अखेर गाडीवर काठ्यांनी प्रहार करून स्विफ्ट कार थांबविली . त्याच दरम्यान नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस स्वप्नील लोहार , सातपुते , शेख यांनी दोघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता गाडीच्या पाठीमागील बाजूमध्ये , हिरा पान , आर एम डि , सेंट तंबाखू ,गाय छाप असे ३० हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा व तंबाखू असा मुद्देमाल आढळून आला . आळेफाटा येथील इरफान हमीद मोमीन ( वय – ४१ ) हा गुटखा विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . या प्रकरणी पुढील तपास अर्जुन घोडे पाटील हे करीत आहे .