पुणे : कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी दरवाजा तोडून वाचविले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता मुंढवा येथील केशवनगरमधील पवार वस्तीत घडली. खासगी चालक म्हणून काम करणाऱ्या ४३ वर्षाच्या ही व्यक्ती कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होती. याबाबतची माहिती अशी, पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचारी राजू मोहिते व महिला शिपाई पवार यांना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पवार वस्तीत एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी केशवनगर पोलीस चौकीचे मार्शल अमोल चव्हाण व सचिन पाटील यांना कळविले़ त्यांनी पवार वस्तीत फिरुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संपतराव भोसले, यांनी तातडीने तेथे उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घाटगे, अभिजित उगले व सागर चौधरी, योगेश काकडे यांना तिकडे पाठविले. पवार वस्तीतील पहिल्या मजल्यावर ते आत्महत्या करीत असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली. पोलीस त्या ठिकाणी पोहचले तर दरवाजा बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर नायलॉनच्या दोरीने एकाने गळफास घेतलेला होता. पोलिसांनी तातडीने त्याला खालून उचलून धरले व दुसऱ्या पोलिसांनी त्याच्या गळ्यातील दोरी काढून खाली घेतले. त्याला पाणी पाजून शांत केले. पोलीस आणखी काही मिनिटे जरी उशिरा पोहचले असते तर, त्याचे प्राण वाचविणे शक्य झाले नसते. त्याला पोलीस ठाण्यात आणून वरिष्ठ पोलिसांनी समजावून सांगितले व आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.
कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करायला निघालेल्या एकाचे पोलिसांनी वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 8:18 PM